हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न बुडतेय खाडीत

हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न बुडतेय खाडीत

गुहागर - पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणलेली बोट सुरू होण्यापूर्वीच दाभोळ खाडीकिनारी पाण्यात कलंडली. त्यामुळे पर्यटन महामंडळाचे हाऊसबोट पर्यटनाचे स्वप्न सध्यातरी खाडीत बुडाले आहे. लक्षावधी रुपये खर्च करून तयार केलेली बोट पाण्यात बुडत चालल्याचे गांभीर्य रत्नागिरीतील पर्यटन महामंडळाला नाही. या नुकसानाला जबाबदार कोण, असा प्रश्न सध्या दाभोळमध्ये विचारला जात आहे. 

दाभोळ येथे सुवर्णदुर्ग शिपिंग कॉर्पोरेशनलगत पर्यटन महामंडळाच्या मालकीची हाऊसबोट गेले चार महिने उभी आहे. बोटीची देखभाल न केल्याने पाणी उपसा करणारा पंप बंद पडला. तळातून बोटीत पाणी जाऊ लागले. परिणामी गेले दोन महिने ही बोट दाभोळ खाडीत हेलकावे खात आहे. 

कोणतीही बोट पाण्यात उभी असते. त्यावेळी तिचे डिझेल इंजिन सुरू ठेऊन बोटीतील पाणी बाहेर काढण्याचा पंप २४ तास सुरू ठेवावा लागतो. या हाऊसबोटीची देखभाल करण्याची जबाबदार व्यक्ती निश्‍चित नाही. त्याचबरोबर पौष महिन्यापासून ओहोटीवेळी पाण्याची पातळी खूप खाली जाते. खाडीकिनारी नांगरलेली हाऊसबोट ओहोटीच्या वेळी जमिनीला टेकली.

सर्वसाधारणपणे बोट जमिनीला टेकली की, एका बाजूला कलंडते व कलंडलेली बोट भरतीच्या वेळी सरळ होऊन तरंगू शकत नाही. त्यामुळे बोटीत पाणी शिरते. हे पाणी हळूहळू वाढत जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे हाऊसबोट पर्यटनाचा उपक्रम महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने सुरू केला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर दाभोळ आणि बाणकोट खाडीत जलपर्यटनाचा उपक्रम पर्यटन महामंडळाला सुरू करायचा आहे. त्यासाठी केरळमधून दाभोळ धक्‍क्‍याला पर्यटन महामंडळाची पहिली हाऊसबोट लागली. या बोटीत दोन कुटुंबांसाठी स्वतंत्र, आकर्षक बेडरूम आहेत. बोटीवरच चहा, नाश्‍ता व जेवण मिळू शकते.

सुसज्ज स्वयंपाकघर आहे. २४ तासांसाठी ही बोट पर्यटकांना देण्यात येते. ५ ते ७ हजार रुपयांमध्ये दाभोळ खाडी सफरीचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. सध्या ही बोटच कलंडू लागल्याने दाभोळ खाडी सफरीची योजना सुरू होण्याआधी हेलकावे खात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com