सिंधुदुर्गात 'यामुळे' कोलमडले गृहिणींचे बजेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

रोजच्या जेवणासाठी लागणारा कांदा दिवसेंदिवस महाग होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याची वाटचाल किलोला शंभरच्या दिशेने सुरू झाली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत 80 रुपये किलो दराने कांदे विकले जात आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. 

कणकवली ( सिंधुदुर्ग ) : रोजच्या जेवणासाठी लागणारा कांदा दिवसेंदिवस महाग होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसात कांद्याची वाटचाल किलोला शंभरच्या दिशेने सुरू झाली आहे. सध्या स्थानिक बाजारपेठेत 80 रुपये किलो दराने कांदे विकले जात आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. 

यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी आणले. उभी पिके आडवी झाली त्यामुळे भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. आता कांद्याचा दर झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या महिना- दोन महिन्यापूर्वी किलोला 30 ते 40 रुपये दराने विकला जाणारा कांदा प्रत्येक आठवड्यात दहा रुपयांनी वाढू लागला आहे.

हेही वाचा - क्यार वादळातील नुकसानग्रस्तांना तुटपुंजी भरपाई

ठेवणीचा कांदा संपल्याने दरवाढ

कोकणात कांदा ठेवणीसाठी घेतला जातो. साधारण फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत प्रत्येक कुटुंबाकडे शंभर किलोच्या आसपास कांदे साठवून ठेवतात. कांदा साधारण ऑक्‍टोंबर, नोव्हेंबरपर्यंत वापरला जातो. त्यानंतर बाजारात नव्याने पीक आले की कांद्याचे दर स्थिर राहतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात कांदा साठवून ठेवण्याची पद्धत केवळ पावसाळी हंगामापुरतीच असते. ठेवणीचा कांदा संपल्यानंतर ग्राहकही आता बाजाराकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. कांदा उत्पादकांना चांगला दर मिळत नसल्याने शेतकरीही चिंतेत आहेत; मात्र गृहिणींचे बजेट सातत्याने कोलमडू लागले आहे. कांद्याने डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली आहे. सध्या 80 रुपये किलो दराने विकला जाणारा कांदा पुढच्या आठवड्यात शंभरी गाठण्याची शक्‍यता विक्रेते व्यक्त करू लागले आहेत.

कांद्याबरोबर लसूणही 250 रुपये किलो

कांद्याबरोबर लसूणही 250 रुपये किलो दराने विकला जात आहे. केवळ बटाट्याचे दर स्थिर आहेत. स्थानिक बाजारपेठेत बटाटे पंचवीस-तीस आणि पस्तीस रुपये किलो दराने विकले जात आहेत. नव्याने विक्रीसाठी आलेला कच्चा कांदा 70 ते 75 रुपये तर सुका कांदा 80 ते 85 रुपये किलोने काही ठिकाणी विकला जात आहे.  

हेही वाचा -  निसर्गाने हिरावल्याने तरूणांसमोर उरला हा पर्याय 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housewives Budgets Collapse Due To Hike In Onion Rate