शंभरीतही आजीबाई घालतात सूर्यनमस्कार (Video)

मयूरेश पाटणकर
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

लक्ष्मीबाईचा 90 वर्षे अखंड सूर्यनमस्कार यज्ञ 
शंभरीतही ठणठणीत

गुहागर - वयाच्या शंभराव्या वर्षी डोळ्याला चष्मा नाही, औषधाची एकही गोळी लागत नाही, रोज भल्या पहाटे उठून 12 सूर्यनमस्कार आणि योगासने करणारी ठणठणीत आजी म्हणजे लक्ष्मीबाई. रत्नागिरी तालुक्‍यातील कोळंबे गावात लक्ष्मीबाइ राहतात. आजही त्या स्वयंपाकघरातील सर्व कामे नातीसुनानाही लाजवणाऱ्या चपळाईने करतात. ही गोष्ट आहे लक्ष्मीबाई दामले यांची.

गोळपला माहेर आणि कोळंब्यात सासर असणाऱ्या लक्ष्मीबाईंनी शंभरी पार केली आहे. त्याचे शिक्षण रत्नागिरीत झाले. त्याचवेळी त्यांना ख्रिश्‍चन बाईंनी अभ्यासासोबत व्यायामाची गोडी लावली. हा काळ स्वातंत्र्यापूर्वीचा. 1930 च्या सुमाराचा.

शिक्षणामुळे लिहिता वाचता येऊ लागले. घरात धार्मिक ग्रंथ सहज उपलब्ध असल्याने त्यांनी रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, स्वरुपानंदाची ज्ञानेश्वरी, श्रीकृष्णाचे बोधामृत असे अनेक ग्रंथ वाचले आहेत.

लहानपणी पाठ केलेल्या ओव्या, श्‍लोक आजही मुखोद्‌गत आहेत. पूर्वीच्या काळी महिला जात्यावर धान्य दळताना, धान्य निवडताना आदी दैनंदिन कामे करताना त्या कामाला साजेशा ओव्या रचत, त्याला चाल देत. तसेच बारसे, हळदीकुंकू, लग्न, मुंज आदी कार्यक्रम, उत्सवातही ओव्या म्हणत. अशा शंभरहून अधिक ओव्या लक्ष्मीबाई सहज म्हणतात.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

1985 साली या आजींनी रत्नागिरी ते मुंबई विमानाने प्रवास केला आहे. लक्ष्मीबाई आजही एकट्या मुंबईपर्यंतचा प्रवास करतात. 10 ते 15 माणसांचे जेवण या वयातही आजी करू शकतात, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या बैठकीला प्रफुल्ल पटेल यांची दांडी

या सर्वांचे रहस्य सांगताना लक्ष्मीबाई म्हणाल्या, "आजही सकाळी 5.30 वाजता उठून मी 12 सूर्यनमस्कार घालते. केळशीतील सूर्यनारायण मंदिरात सूर्यनमस्कार यज्ञाचे वेळी 80 सूर्यनमस्कार घातले म्हणून देवस्थानने त्यांचा सत्कार केला होता. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या सूर्यनमस्कार यज्ञातही त्या सहभागी झाल्या होत्या. वयाच्या 10 व्या वर्षापासून सूर्यनमस्कार आणि आसने असा व्यायाम करत असल्याने मला कोणताही आजार नाही.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundred Years Old Woman Does Regularly Sunpray