पत्नीचा खूनप्रकरणी मालवण तालुक्यात पतीला अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

मालवण - कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या गोपाळ देसाई (वय 28) या विवाहितेचा खून केल्याप्रकरणी संशयित पती गोपाळ देसाई (वय30) याला अटक केली. त्याला कुडाळ येथील न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

मालवण - कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या गोपाळ देसाई (वय 28) या विवाहितेचा खून केल्याप्रकरणी संशयित पती गोपाळ देसाई (वय30) याला अटक केली. त्याला कुडाळ येथील न्यायालयाने 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या गोपाळ देसाई ही नवविवाहिता बुधवारी रात्री जेवण आटोपून झोपी गेल्यानंतर तिला सकाळी उठविण्यास गेलेल्या सासूला ती निपचित पडल्याचे दिसून आले. कुटुंबियांनी खासगी डॉक्‍टरांना तपासणीसाठी बोलाविले असता ती मृत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची खबर देसाई कुटुंबियांनी कट्टा पोलिस दूरक्षेत्रास दिली होती. 

यात काव्या हिला नागिणीचा आजार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली. 
काव्या देसाई हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात झाले. यात चार तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर काव्या हिचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे स्पष्ट केले. त्याबाबतचा वैद्यकीय अहवाल येथील पोलिसांना प्राप्त झाला. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. यात शुक्रवारी मध्यरात्री काव्या हिचा पती गोपाळ देसाई याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. 

काव्या हिचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी कुडाळ डिगस येथील तिच्या वडिलांच्या ताब्यात दिला. यावेळी पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी काव्याचा मृत्यू हा अनैसर्गिक असल्याचे तसेच तिचा गळा दाबून खून झाला असल्याचे सांगितले. याबाबत तक्रारीची विचारणा केली असता वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिला.

कुणकवळे टेंबवाडी येथील काव्या देसाई हिचे माहेर कुडाळ डिगस येथे आहे. तीन वर्षांपूर्वी काव्या हिचे लग्न झाले होते. लग्नानंतर काव्या हिच्या सासरी मारझोड किंवा मानसिक त्रास असा प्रकार घडला असेल का? याबाबत येथील पोलिस तपास करत आहेत. बुधवारी काव्या हिच्या मृत्यूच्या घटनेपूर्वी कुणकवळे येथील सासरच्या घरी काव्या, तिचा पती, सासू-सासरे व तिची छोटी मुलगी आरोही अशी पाच कुटुंबातील सदस्य होते.

यादिवशी काव्या तिची मुलगी आणि सासू या तिघेजणी हॉलमध्ये झोपले होते तर तिचा पती व सासरे बाजूच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपी गेले होते. सकाळी आरोही ही दूध पाजण्यासाठी रडत असताना तिच्या सासूला जाग आली. तिने काव्या हिला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याचे पाहून कुणकवळे येथील खासगी डॉक्‍टरांना पाचारण केले. उपविभागीय पोलिस अधिकारी निमित गोयल, श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनीत चौधरी तपास करत आहेत. 

नेमक्‍या कारणाचा शोध सुरू 
काव्या हिचा खून रात्री 12 ते सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. काव्या हिला नागीणचा आजार होता. मात्र ती वर्षभरापूर्वी बरी झाली होती अशी माहिती देण्यात आली. काव्या हिचा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा पोलिस शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband arrested in Malvan taluka in murder case