बोलीभाषेमुळे भाषा समृद्ध होते - दलवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने शनिवारी अपरात्न साहित्य संमेलनास सुरवात झाली. वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी संमेलनाचा हेतू स्पष्ट केला. दोन दिवसांच्या या संमेलनात कोकणातील प्रत्येक बोलीभाषेवर भाष्य होणार आहे.

चिपळूण - बोलीभाषेमुळे भाषा अधिक समृद्ध होते. समाजाची संस्कृती वाढविण्यासाठी बोलीभाषांचे जतन आवश्‍यक आहे. बोलीभाषेवर अधिक अभ्यास आणि संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे. तसे झाल्यास बोलीभाषा अधिक समृद्ध होतील, असा विश्‍वास खासदार हुसेन दलवाई यांनी कोकणातील बोलीभाषा चर्चासत्रात व्यक्त केला.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने शनिवारी अपरात्न साहित्य संमेलनास सुरवात झाली. वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी संमेलनाचा हेतू स्पष्ट केला. दोन दिवसांच्या या संमेलनात कोकणातील प्रत्येक बोलीभाषेवर भाष्य होणार आहे. कोकणातील बोलीभाषांविषयीच्या पहिल्या चर्चासत्रात अध्यक्षस्थानी खासदार हुसेन दलवाई होते. खासदार दलवाई (मुस्लिम बोली), प्रा. एल. बी. पाटील (आगरी), इंग्रेशिअस डायस (सामवेदी बोली), कीर्ती हिलम (कातकरी), पंढरीनाथ रेडकर (मालवणी) यांनी आपल्या बोलीभाषेचे महत्त्व सांगितले.

दलवाई म्हणाले, ""बोलीभाषेवर अनेक लेखकांनी कादंबऱ्या लिहिल्या. भाषा लोकांना एकत्र आणते. मराठी किती प्रगल्भ आहे याची संवेदना लक्ष्मण माने यांच्या कैकाडी बोलीभाषा असलेल्या "उपरा' कादंबरीतून दिसते. महिलांनी बोलीभाषा अधिक जतन करण्याचा प्रयत्न केला आहे.'' डायस म्हणाले, ""वसईतील लोकांना मराठीचे दडपण आले तरी त्यांनी सामवेदीचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न केला. कादोडी बोलीभाषेतून अनेक लेखकांनी लिखाण केले. येथील तरुण फेसबुकवरून कादोडीत लिखाण करीत ती समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.''

रेडकर म्हणाले की, मालवणी भाषेला गोडवा आहे. मच्छिंद्र कांबळी, श्री. ना. पेंडसे आदींनी मालवणी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी योगदान दिले.

प्रा. पाटील यांनी अलीकडच्या काळात आगरी लोकांमध्ये झालेला बदल, त्यांचे राहणीमान, शेतीकामातील गाणी, टोमणे मारण्याच्या पद्धती, पोवाडे आगरी बोलीत सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली.

Web Title: hussain dalwai talked about language