सत्त्व देणाऱ्या कचरा वनस्पतीकडे दुर्लक्ष

मकरंद पटवर्धन
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पूर्वी बरेच लोक कचरा सत्त्व काढत होते. मातीच्या भागात ही वनस्पती आढळते. थंडी जास्त असेल तेव्हा ही वनस्पती जास्त वाढते. बागेमध्ये याची थोड्या प्रमाणात लागवड केली आहे. 
- वासुदेव केळकर,
ढोकमळे

रत्नागिरी - उष्णतेपासून आराम देणाऱ्या कचरा वनस्पतीच्या सत्त्वाला मोठी मागणी आहे. बाजारात मिळणाऱ्या आरारोटच्या सत्त्वापेक्षा हे खूपच जास्त क्षमतेचे मानले जाते.  नेवरे, ढोकमळे, नांदिवडे व काही परिसरात ही वनस्पती आढळते.

हळदीच्या पानांप्रमाणे पाने असतात. मात्र, या वनस्पतीची व्यावसायिक दृष्टीने मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची गरज आहे. सध्या निसर्गतः उगवलेल्या या झाडाच्या मुळ्यांपासून सत्त्व घरगुती स्वरूपात बनवण्याचे काम काही मोजक्‍या ठिकाणी सुरू आहे. हळदीच्या पिकाप्रमाणे कचरा ही वनस्पतीसुद्धा चांगले उत्पन्न देणारी आहे. मात्र, कोकणातील शेतकऱ्यांनी याची त्या प्रकारे लागवड करणे गरजेचे आहे.

सुमारे एक किलो मुळ्यांपासून दीडशे ते अडीचशे ग्रॅम एवढे सत्त्व तयार होते. सुमारे ७०० ते ८०० रुपये किलो दराने सत्त्व विक्री केली जाते. सत्त्व बनवण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. कोतवडे येथील प्रगतशील शेतकरी व निवृत्त शिक्षक पुरुषोत्तम मोने यांनी सांगितले, पूर्वी कचरा वनस्पती मिळण्याचे प्रमाण बरेच होते. अलीकडे ही वनस्पती फारशी आढळत नाही. पूर्वी मुळ्या जात्यावर किसून काढल्या जायच्या आता मिक्‍सरचा वापर केला जातो.

सत्त्वाची पद्धत

 मुळ्यांवरील टरफल काढून किस काढतात. तो मिक्‍सरमधून दळून पाण्यात भिजवून त्यातील चोथा काढून टाकला जातो. पाण्याच्या तळाशी गोळा होणारे पांढरे सत्त्व सहा दिवस उन्हात सुकवले जाते. पूर्वी जात्यावर कचऱ्याच्या मुळ्या बारीक केल्या जात. मुळ्यांचे काप काढूनही सत्त्व बनवण्याची पद्धत आहे. 

औषधी आणि गुणकारी

कचरा सत्त्व उष्णतेच्या विकारावर गुणकारी आहे. सत्त्वाची लापशी, खोबरे घालून वड्या करतात. तोंड येणे, घसादुखीवरही उपयुक्त.
 

Web Title: Ignore Kachara plants