बेकायदा डोंगर कापणीकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

देवरूख - डोंगरकडे कोसळून मातीची धूप जोरात होत असल्याने नद्या गाळाने भरत आहेत. याचा परिणाम पाणीटंचाईवर होत असताना संगमेश्‍वर तालुक्‍यातील गोळवली गावात बेडकोंडच्या पऱ्ह्याजवळ संपूर्ण डोंगरच तीन जेसीबीच्या साह्याने खोदण्याचे बेकायदा काम सुरू असल्याबद्दल पोलिसपाटील अनंत पुरुषोत्तम पाध्ये यांनी महसूल विभागाकडे रीतसर तक्रार केली आहे. महसूल विभागाने याची गंभीरपणे दखल घेतली नाही, अशी खंत पाध्ये यांनी व्यक्‍त केली.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील गोळवली हे गाव मुंबई-गोवा महामार्गालगत आहे. शहरातील धनाढ्य मंडळींनी या गावात जमिनी खरेदी केल्या असून या मंडळींकडून सर्रास पर्यावरणाची हानी केली जाते. ही बाब पोलिसपाटील पाध्ये यांनी महसूल यंत्रणेच्या नजरेस आणून दिली आहे. 

चार दिवसांपूर्वी गोळवली गावातील बेडकोंडच्या पऱ्ह्याजवळ तीन जेसीबी आणून एक हिरवागार डोंगरच कापून काढला जात असल्याचे पाध्ये यांनी पाहिले. डोंगर कापून मातीचे बेकायदा उत्खनन सुरू असल्याची तक्रार पोलिसपाटील यांनी संबंधित तलाठ्याकडे केली; मात्र त्यांनी पंचनाम्याला येतो, आपण घरीच थांबा; असे सांगूनही ते प्रत्यक्षात आले नाहीत, असा दावा पाध्ये यांनी केला. पोलिसपाटीलांनी तलाठी न आल्याने बेकायदा माती उत्खननाची तक्रार संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे केली. ते दोन दिवसांनी खोदाईचे काम पूर्ण झाल्यावर आले. पाध्ये यांनी मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा करा, अशी विनंती केली; मात्र जागेवर कोणीच नाही, तर पंचनामा कोणाचा करायचा असा सवाल करून मंडळ अधिकारी जागेवरून निघून गेले. यावरून मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, असा सवाल पाध्ये यांनी केला आहे.

बेकायदा माती उत्खननामुळे मातीची मोठ्या प्रमाणात धूप होणार आहे. खाली असणाऱ्या शेतीलाही धोका निर्माण होणार आहे. या बेकायदा डोंगर कापणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंडळ अधिकारी, तलाठी यांची प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे.
- अनंत पाध्ये, पोलिस पाटील

Web Title: Ignoring illegal mountain cutting