जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या `आंबोलीचा` का खुंटलाय विकास?

Ignoring the work of Amboli Ghat konkan sindhudurg
Ignoring the work of Amboli Ghat konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गतवर्षी मुख्य धबधब्याजवळ अतिवृष्टीमुळे रस्ता खचलेला व महिनाभर बंद असलेली वाहतूक लक्षात घेता या वर्षी आवश्‍यक खबरदारी घेताना बांधकाम विभागाने फक्त कागदावरच काम केले आहे. यामुळे अतिवृष्टी झाल्यास गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. दरड कोसळण्याची टांगती तलवार कायम असतानाच कधीही कोसळतील अशी मोठी झाडेही घाटरस्त्यात असल्याने पावसात या मार्गावरून वाहतूक धोकादायक ठरणार आहे. 

ब्रिटिशकालीन असलेला आंबोली घाट रस्ता दरवर्षी पावसाळ्यात काही ना काही कारणांनी सतत चर्चेत असतो. आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आणि येथील धबधबे निसर्ग सौंदर्यामुळे दरवर्षी आंबोलीला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात; मात्र एकीकडे जगाच्या नकाशावर पोहोचलेली आंबोली विकासाच्या दृष्टीने आजही मागे आहे. येथील घाटरस्त्याची झालेली दुरवस्था हे याचे मुख्य उदाहरण आहे. 

आंबोली घाटरस्त्याचा विचार करता हा मार्ग तसा वाहतुकीस कमकुवत झाला आहे. याठिकाणी वारंवार कोसळणाऱ्या दरडी पाहता आंबोलीला पर्यायी रस्त्याबाबत फक्त चर्चा झाल्या; मात्र प्रत्यक्षात अद्याप काहीच हालचाली झाल्या नाही. गतवर्षी तर अतिवृष्टी काळात मुख्य धबधब्याच्या ठिकाणी हा रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक तब्बल महिनाभर बंद होती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसोबत तेथील ग्रामस्थांचा सावंतवाडी शहराशी संपर्कच तुटला होता. घाट रस्ता खचण्याचे व कोसळण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील गटारांचे न झालेले काम.

यंदाही बांधकाम विभागाने गटारातील वाहून आलेली माती, दगड, साफ केलेले नाही. कागदावर दिसण्यापुरते हे काम झाले आहे. त्यामुळे गटारातील पाणी रस्त्यावरून विरुध्द दिशेला वाहते आणि हेच कारण घाट कोसळण्याला कारणीभूत ठरते. पूर्वी मैलकुली कामगार गटारामध्ये बांध घालून पाणी दोन संरक्षक कठड्यांमध्ये असलेल्या मोकळ्या अंतरातून दरीत सोडत; मात्र आता असे काम होत नसल्याने घाट रस्ता यावर्षीही धोकादायक बनला आहे. दोन ते तीन ठिकाणी अतिसंवेदनशील आहेत. नव्याने केलेले कठड्याचे काम किती वर्षे टिकेल याचा भरवसा नाही. 

कोसळणाऱ्या दरडीचा विचार करता मुख्य धबधब्याला लागून असलेला दरडीचा भाग जास्त धोकादायक आहे. अन्य दोन ठिकाणीही दरड कोसळण्याची शक्‍यता आहे. अलीकडेच धबधब्यांच्या रेलींगवर दरडीचा भलामोठा दगड कोसळला. सुदैवाने पर्यटन बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. त्यामुळे पूर्वी इतका धबधबा म्हणावा तसा आता सुरक्षित राहिला नाही. 

बांधकाम विभागाने नव्याने रिप्लेक्‍टर बसविले; मात्र त्याचा काहीच उपयोग नसल्यासारख्ये आहेत. रात्रीच्या वेळी, पावसात तसेच धुक्‍यात त्याचा प्रकाशच पडत नाही. वळणावरती वाढलेली झाडी तशीच आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे पावसात घाटरस्ता वाहतुक करताना जीव मुठीत धरून करावी लागणार आहे. 

"त्या' पुलाची मलमपट्टी 
घाट रस्त्यात चाळीस फूट उंच असलेले ब्रिटिशकालीन पूल कमकुवत झाले आहे. याबाबत लक्ष वेधल्यानंतर बांधकाम विभागाने तडे गेलेल्या ठिकाणी सिमेंट भरून मलमपट्टी करण्याचे काम केले होते; मात्र या पुलाचे काम पूर्णतः नव्याने होणे गरजेचे आहे. लॉकडाउनच्या काळात हे काम करण्यासाठी मोठा अवधी होता; मात्र तसे न झाल्याने हे पूल कधीही धोका देऊ शकते. 

पर्यायी रस्त्याबाबत अनास्था 
कमकुवत होत चाललेल्या आंबोली घाट रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून नेनेवाडी, फणसवडे, दाणोली असा मार्ग आहे; मात्र हा मार्ग वनविभागाच्या अखत्यारित असल्याने आत्तापर्यंत फक्त चर्चा करण्यापलीकडे काहीच हालचाली झाल्या नाही. दुसरीकडे अस्तित्वात असलेला चौकूळ, कुंभवडे, तळकट, बांदा या पर्यायी रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले जात नसल्याने खड्ड्यातून, चिखलातून येथून प्रवास करावा लागत आहे. हा रस्ता सुरळीत करणे गरजेचे होते; परंतु या ठिकाणीही दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com