वरची देवलीत अवैध वाळू उपसा

प्रशांत हिंदळेकर
Wednesday, 30 September 2020

महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील वरची देवली वाघवणे येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू उपशासाठी परराज्यातील कामगार दाखल झाले आहेत. हे कामगार क्वारंटाईन न राहता खाडीपात्रात वाळू उपशास उतरत आहेत. पुलालगत उपसा होत असल्याने पुलाला धोका आहे. खाडीपात्रात होड्यांची संख्या वाढली असून मेरिटाईम बोर्डाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

वरची देवली, खालची देवली भागात सध्या अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू आहे. या भागातील वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नसतानाही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळू उपशाच्या कामासाठी सध्या मोठ्या प्रमाणात कामगारही गावात दाखल झाले आहेत; मात्र ते क्वारंटाइन न राहता थेट खाडीपात्रात वाळू काढण्यास उतरत असल्याचे दिसून आले आहे.

शिवाय गावातही त्यांचा बिनधास्त वावर सुरू आहे. वाळू उपसा करणाऱ्या डंपरवर कारवाई होताना दिसते; मात्र वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या होड्यांवर प्रशासन केव्हा कारवाई करणार? सध्या खाडीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होड्या उतरविण्यात आल्या असून होड्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. 

कारवाईची गरज 
याकडे मेरिटाईम बोर्डाचे दुर्लक्ष असून त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे. वाळूच्या बेसुमार उपशामुळे देवली पुलाला धोका निर्माण झाला आहे. वाळू उपशामुळे खार बंधाराही खचला असून त्यामुळे भविष्यात लोकवस्ती, शेती, माड बागायतीस धोका आहे. त्यामुळे महसूल, मेरिटाईम बोर्डाने याची तत्काळ दखल घेत कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sand extraction at varchi Devli konkan sindhudurg