रत्नागिरीत अनुभव नसताना 'या' दोन तरुणांनी खेचून आणले यश

राजेश कळंबट्टे | Monday, 10 August 2020

अनुभव  दोघांकडे नव्हता, पण इच्छाशक्‍ती होती.

रत्नागिरी : लॉकडाउन काळात सेंद्रिय पद्धतीने भाजी लागवड करीत तालुक्‍यातील सांडेलावगण येथील दोन तरुणांनी रोजगाराचा प्रश्‍न सोडविला आहे. घराजवळील सहा ते सात गुंठे जमिनीत ही परसबाग संकल्पना त्यांनी अस्तित्त्वात आणली आहे. 

सांडेलावगणमध्ये जग पुस्तकांचे ग्रंथालय आणि फिरते वाचनालय संकल्पना तरुणांनी हाती घेतली. त्यात कार्यरत असलेले राहुल बेनेरे, धनंजय पाष्टे यांच्यापुढे रोजगाराची अडचण होती. या संदर्भात गावातील ग्रंथालयाचे संचालक प्रसाद पाष्टे यांच्याशी संवाद साधला. त्यातून भाजी लागवड करण्याचे निश्‍चित झाले. धनंजय यांच्या पडक्‍या घराची जागा विनावापर होती. तसेच, नवीन घराजवळही थोडीशी जागा होतीच. तेथे ठेवलेले विविध प्रकारचे सामान इतरत्र ठेवले. यात धनंजय यांचे वडील नथुराम पाष्टे यांचे सहकार्य मिळाले. 

हेही वाचा - पेन्शनधारकांना दिलासा ; शिक्षणमंत्र्यांकडून ही आहे गुडन्यूज...

भाजी लागवडीचा अनुभव या दोघांकडे नव्हता, पण इच्छाशक्‍ती होती. वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर व हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यासाठीची बियाणे, सेंद्रिय खते, फवारणीची साधने असा थोडा खर्च त्यांनी केला. सेंद्रिय पद्धतीने लागवड सुरू केली. त्यात सहा ते सात गुंठ्यांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पिके घेतली आहेत. दोन महिन्यांनी त्यावर फळे लागली आहेत. ही भाजी तयार झाली असून, गावातच विक्री 
सुरू आहे. 

परसबाग संकल्पना राबविण्यात पंचायत समितीच्या सदस्या साक्षी रावणंग, संतोष रावणंग यांच्यासह जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे आणि विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा -  लाॅकडाउनकाळात सामाजिक जागृती; शिक्षकाच्या कलेचे कौतुक...

"वाचनालयातील वाचनातून आणि अनुभवातून आपल्या पोटाची सोय कशी करता येईल, याचाही आम्ही सातत्याने विचार करीत आलो. त्यामुळे आज लॉकडाउन असताना आम्ही आमच्या रोजगाराची व्यवस्था केली."

- धनंजय पाष्टे, तरुण

"कोकणातील मुलांचे शिक्षण कमी होते आणि ते छोट्या-छोट्या नोकऱ्यांकडे वळतात. त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले उच्च शिक्षणाकडे वळू शकतात." 

- राहुल बेनेरे, सांडेलावगण

संंपादन - स्नेहल कदम