आयात-निर्यातीतील मंदीतही रेल्वे आर्थिक ट्रॅकवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

फटक्‍यातून उभारी - शेवटच्या तीन महिन्यांत प्रवासी वाहतुकीने तारले

सावंतवाडी - जागतिक मंदीमुळे थंडावलेल्या आयात-निर्यातीचा गेल्या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेला फटका बसला; मात्र शेवटच्या तीन महिन्यांत विशेषतः प्रवासी वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे रेल्वे पुन्हा आर्थिक ट्रॅकवर आल्याचे चित्र आहे.

फटक्‍यातून उभारी - शेवटच्या तीन महिन्यांत प्रवासी वाहतुकीने तारले

सावंतवाडी - जागतिक मंदीमुळे थंडावलेल्या आयात-निर्यातीचा गेल्या आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेला फटका बसला; मात्र शेवटच्या तीन महिन्यांत विशेषतः प्रवासी वाहतुकीत झालेल्या वाढीमुळे रेल्वे पुन्हा आर्थिक ट्रॅकवर आल्याचे चित्र आहे.

मार्च एंडमुळे इतर शासकीय विभागांप्रमाणेच भारतीय रेल्वेकडूनही वर्षभरातील आर्थिक लेखाजोखा मांडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. रेल्वेतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ हे आर्थिक वर्ष रेल्वेसाठी खडतर ठरले. रेल्वेला आर्थिकदृष्ट्या फायदा मिळवून देण्यात प्रवासीपेक्षा माल वाहतुकीचा वाटा मोठा असतो. यावर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या व्यवस्थेत सुधारणांसाठी अनेक उपक्रम राबविले. देशभरात नवे प्रकल्प सुरू करण्यात आले; मात्र दुसरीकडे जागतिक मंदीचा थेट फटका रेल्वेच्या मालवाहतुकीला बसला. मंदीमुळे आयात-निर्यात थंडावली. आयर्न ओव्हर, कोळसा आदींच्या देशांतर्गत मालवाहतुकीत रेल्वेचा वाटा मोठा असतो. पण ते प्रमाण घटल्याने रेल्वेचे आर्थिक गणित कोलमडले. त्यातच कर्मचाऱ्यांसाठीच्या सातव्या वेतन आयोगाचा आर्थिक बोजा रेल्वेवर पडला. पेन्शनच्या रकमेतही वाढ झाली. बोनसवरील मर्यादा गेल्यामुळे त्याचाही आर्थिक ताण रेल्वेवर आला.

गेल्या काही वर्षांत देशांतर्गत रस्त्याची स्थिती सुधारली आहे. महामार्गाचे विस्तारीकरण, नवे महामार्ग, रस्ते याचा परिणामही रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीवर झाला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून रेल्वेसाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या खडतर ठरले. असे असले तरी जानेवारी २०१७ पासून यात बदल झाले. विशेषतः प्रवासी वाहतुकीची स्थिती सुधारली. यामुळे रेल्वेची आर्थिक गाडी पुन्हा रुळावर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही नव्या सुधारणांचाही प्रवासी वाढ होण्यासाठी फायदा झाला आहे. देशभरात अनेक स्थानकांचे अपग्रेडेशन झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही सुरू झाला आहे. या सगळ्याचा पुढच्या काळात रेल्वेच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागेल, असा विश्‍वास रेल्वेच्या सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेच्या महसुलातही वाढ होत आहे. कोकण रेल्वेचा या वर्षाचा प्रवासही काहीसा खडतर होता; मात्र आता महसुलात वाढ होत असल्याचे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल. के. वर्मा यांनी सांगितले.

असे आहे उत्पन्न (२०१६-१७)
 एकूण उत्पन्न १.६८ लाख कोटी 
 प्रवासी वाहतूक ४८००० कोटी
 इतर विभाग ११००० कोटी
 मालवाहतूक ११०७ बिलियन टन

Web Title: Import-export PTI railway track on economic