देवगड तालुक्यातील अत्याचार प्रकरणातील आरोपीस कारावास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

सिंधुदुर्गनगरी - अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी धनाजी नवना आयरे (वय २५, रा. पंढरपूर) याला येथील विशेष तथा प्रमुख सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी विविध कलमांखाली सात वर्षे सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा केली.

सिंधुदुर्गनगरी - अल्पवयीन मुलीला रात्रीच्या वेळी पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी धनाजी नवना आयरे (वय २५, रा. पंढरपूर) याला येथील विशेष तथा प्रमुख सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी विविध कलमांखाली सात वर्षे सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा केली.

देवगड तालुक्‍यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीला रात्रीच्या वेळी आरोपी धनाजी याने ती घराबाहेर आली असता तोंडावर हात ठेवून तिला पळवून नेले. ही घटना १५ जुलै २०१७ ला घडली. याबाबत देवगड पोलिस ठाण्यात १७ जुलैला गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी १९ जुलै २०१७ ला पिंपळनेर (सोलापूर) येथून आरोपी धनाजी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या काळात त्याने संबंधित मुलीवर वारंवार अत्याचार केले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता २५ जुलै २०१७ पर्यंत पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडी व नंतर जामिनावर मुक्त केले होते. या प्रकरणी बालकांचा लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यांतर्गत विविध गुन्ह्यांखाली आरोपी आयरे याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

देवगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर शिवगण, सहायक पोलिस निरीक्षक सुनील राणे, पोलिस नाईक प्रशांत जाधव, सुप्रिया भागवत यांनी या प्रकरणी तपास करून आरोपीविरोधात पुरावे गोळा केले. येथील न्यायालयात या प्रकरणी झालेल्या सुनावणीत विविध साक्षीदारांची साक्ष, मिळालेले भक्कम पुरावे आणि सरकारी वकील सूर्यकांत खानोलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी आयरे याला विविध कलमांखाली वेगवेगळी शिक्षा व दंड ठोठावण्यात आला. ही शिक्षा एकत्रित भोगायची असल्याने आरोपी आयरे याला एकूण सात वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अधिक सहा महिन्यांचा कारावास अशी शिक्षा विशेष तथा प्रमुख सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी ठोठावली आहे.
 

Web Title: Imprisonment for atrocities in Devgad taluka