जादूटोण्याच्या धमकीने अत्त्याचार; तरुणास सात वर्षे सश्रम कारावास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले आरवली देऊळवाडी येथील समीर जाधव (वय 33) याला जादूटोणा प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्त्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सात वर्षांचा सश्रम कारावास आणि 11 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 100 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा आज ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले. 

सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले आरवली देऊळवाडी येथील समीर जाधव (वय 33) याला जादूटोणा प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्त्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सात वर्षांचा सश्रम कारावास आणि 11 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास 100 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा आज ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. व्ही. विरकर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता स्वप्नील सावंत यांनी काम पाहिले. 

तू माझी पूर्वजन्मीची पत्नी आहेस. त्यामुळे या जन्मीही तू माझ्याशी लग्न कर; अन्यथा माझ्याकडे असलेल्या दैवीशक्ती आणि जादूटोण्याने मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला ठार मारेन, असे धमकावत एका युवतीचा विविध ठिकाणी वारंवार जबरदस्तीने अत्त्याचार केला. लग्नास व शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून संबंधित मुलीची बदनामी करणारे अश्‍लील पोस्टर्स लावल्याचा आरोप जाधवविरोधात सिद्ध झाला आहे. 

याबाबत माहिती अशी ः आरवली देऊळवाडी (ता. वेंगुर्ले) येथील समीर भगवान जाधव जादूटोणा व देवदेवस्की करणारा असल्याने पीडित युवती आपल्या शेजारणीसोबत त्याच्याकडे केली होती. या शेजारणीला समीर जाधव याने पुन्हा आठ दिवसांनी येण्यास सांगितले. दोघी पुन्हा आठ दिवसांनी त्याकडे गेल्या. समीरने पीडित युवतीची सर्व माहिती विचारून घेत तिचा मोबाइल नंबरही घेतला. त्यानंतर तुला पाहिले की मला समाधान मिळते. तू माझी पहिल्या जन्मीची पत्नी आहेस. त्यामुळे तू ह्या जन्मीही माझ्याशी लग्न कर, असे सांगितले. यानंतर संबंधित पीडित मुलीने समीरकडे जाणे टाळले. त्यानंतर समीर याने "त्या' मुलीला फोन करण्यास सुरवात केली. तिला रस्त्यात गाठत समीरने जबरदस्तीने जीपमध्ये (एम.एच.07/बी- 4475) बसवून वेळागर शिरोडा येथे नेले आणि तिच्यावर अत्त्याचार केले. ही गोष्ट कुणास सांगितली तर माझ्याकडील दैवीशक्ती व जादूटोण्याच्या साहाय्याने तुला आणि तुझ्या घरातील सर्वांना मारुन टाकीन, अशी धमकी दिली. त्यानंतर ती युवती समीर याच्याशी कोणतेच संबंध ठेवण्यास तयार नसल्याने तो तिच्या मोबाइलवर मॅसेज टाकणे, फोन करणे असे प्रकार करत होता. ही बाब तिच्या घरी आलेला तिचा मावसभावाच्या लक्षात आल्यावर त्यांनी समीर जाधव याला फोन करून तिला त्रास देण्याचे प्रकार थांबव असे धमकावले; मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने मृत्यू झाला. त्यानंतर समीर याने "त्या' मुलीला फोन करून बघितलस माझ्यातील दैवी ताकद. तू माझ्याशी लग्न केले नाहीस आणि संबंध ठेवले नाहीस तर मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला असेच मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर विविध ठिकाणी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्त्याचार केला. 

या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या त्या युवतीने समीरला टाळायला सुरवात केली व लग्नास नकार दिला. त्यामुळे समीरने तिचा निधन झालेला मावसभाऊ व ती युवती यांचे फोटो एकत्र जोडून त्याखाली अश्‍लील मजकूर लिहून ते पत्रक त्या युवतीच्या विवाहित बहिणीच्या घराच्या गेटवर आणि दुसरे पत्रक शेजारील फलकावर लावले. त्या युवतीची बदनामी केली. अखेर त्या युवतीने या सर्व प्रकारांना कंटाळून समीर जाधव याच्याविरोधात पोलिस ठाण्यामध्ये 23 मे 2015 रोजी तक्रार दिली. हा प्रकार एप्रिल 2014 ते 22 मे 2015 या कालावधीत घडला. 

पोलिसांनी समीर जाधवविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा अधिनियम 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. सध्या समीर जामिनावर मुक्त होता. 

या प्रकरणाची सुनावणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलगी आणि तिची शेजारीण यांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणाचे तपासी अमलदार म्हणून वेंगुर्ले ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी. एस. भांडये यांनी काम पाहिले. 

आरोपीची रडारड 
शिक्षा ऐकून समीर रडू लागला होता. शिक्षा झाल्यानंतर त्याला पोलिस तुरुंगात नेत असताना बाहेर उभे असलेले त्याचे आई-वडील, भाऊ व बहीण यांनीही आक्रोश केला. 

अशी सुनावली शिक्षा 
या प्रकरणी आरोपी समीर जाधव याला न्यायालयाने 7 वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 50 दिवस साधी कैद, दुसऱ्या कलमाअंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 20 दिवस साधी कैद तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा अधिनियम अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 30 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. ही सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाची असल्याने समीर याला 7 वर्षे सश्रम कारावास आणि 11 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 100 दिवस साधी कैद अशी शिक्षा झाली आहे. दंड केलेल्या 11 हजार रुपयांपैकी 10 हजार रुपये संबंधित पीडित युवतीला द्यावयाचे आहेत. 

Web Title: imprisonment for seven years young