अयोग्य हवामान नोंदींचा विमा परताव्यात अडथळा;  आंबा बागायतदारांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

हवामान आधारित फळ पिकविमा योजना शासनाने लागू केली. निकष तयार करताना उर्वरित महाराष्ट्र आणि कोकणातील हवामान याचा वेगळा विचार होत नाही. कोकणातील भौगोलिक परिस्थिती दर किलोमीटरने बदलते. कातळ, डोंगर, समुद्रकिनारी भाग आणि मैदानी अशा भागात कोकण वसलेले आहे.

रत्नागिरी - कोकणातील भौगोलिक रचनेचा विचार करता महसूल मंडळात एकाच ठिकाणी विमा कंपनीचे हवामान केंद्र असल्याने झालेल्या बदलांची योग्य नोंद होत नाही. परिणामी आंबा बागायतदारांचे नुकसान झाले तरीही परतावा मिळत नाही. पाऊस, कमी व अधिक तापमानाचे सलग तीन दिवसांमधील नोंदीचा निकष भरपाईत अडचण ठरला आहे. 

हवामान आधारित फळ पिकविमा योजना शासनाने लागू केली. निकष तयार करताना उर्वरित महाराष्ट्र आणि कोकणातील हवामान याचा वेगळा विचार होत नाही. कोकणातील भौगोलिक परिस्थिती दर किलोमीटरने बदलते. कातळ, डोंगर, समुद्रकिनारी भाग आणि मैदानी अशा भागात कोकण वसलेले आहे.

ऊन, पावसाच्या नोंदी योग्य पद्धतीने होत नाहीत. उन्हाचा चटका कातळावर ज्या पद्धतीने नोंदला जातो, तो मैदानी किंवा किनारपट्टी भागात नोंदला जाईलच असे नाही. त्यामुळे विमा उतरवलेल्या बागायतदारांना अपेक्षित परतावा मिळत नाही. याबाबत वेळोवेळी शासन दरबारी सूचनाही पाठविल्या जातात; परंतु राजकीय पाठबळाअभावी त्या गुंडाळल्या गेल्या आहेत.

कोकणातील ज्येष्ठ बागायतदारांना विमा संरक्षणाचे योग्य निकष निश्‍चित करून शासनाला सादर केले आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीचा परतावा बागायतदारांना मिळणार आहे. 
यंदा कोकणातील शंभर टक्‍के आंबा बागायतदारांना विमा परतावा मिळाला; मात्र हेक्‍टरी रक्‍कम ही तुलनेत कमी आहे. 

कोकणात गारपीटऐवजी वादळ व वणवे ही प्रमाणके ठेवली पाहिजेत. प्रत्येक महसुली विभागात 2 हवामान केंद्र बसवणे गरजेचे आहे. गावातील बागांमध्ये कमी तापमान असते, तेव्हा सड्यावर ते खूप अधिक असते. हवामान केंद्र बसवताना एक गावात व दुसरे कातळावर बसविणे बंधनकारक करावे. 
- डॉ. विवेक भिडे 

निकषासंदर्भात बागायतदारांची मागणी 

  • 1 नोव्हेंबर ते 31 मे या कालावधीत दैनंदिन पाऊस 5 मिमीपेक्षा जास्त पडून नुकसान झाल्यास भरपाई मिळावी. 
  • कमी तापमानासाठी 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या काळात दैनंदिन तापमान 13 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास भरपाई मिळावी. 
  • जास्त तापमानासाठी 1 मार्च ते 31 मे कालावधीत दैनंदिन अधिकतम तापमान 36 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास भरपाई मिळावी. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Improper Weather Records Hinder Insurance Refunds