गृहराज्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्ग पोलिस दलाची प्रशंसा, म्हणाले...

नंदकुमार आयरे | Wednesday, 29 July 2020

सध्याच्या कोरोनाच्या काळा जिल्ह्यातील पोलीस दल, महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक आहे.'

सिंधुदुर्गनगरी -  सिंधुदुर्ग पोलिस दलाने संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून जिल्हा सुरक्षित केला आहे. संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली असणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून या जिल्ह्याचा आदर्श अन्य जिल्हे घेतील, असा विश्‍वास राज्याचे गृह राज्यमंत्री अनिल देशमुख यांनी सीसीटिव्ही संनिरिक्षण प्रकल्पाच्या प्रारंभ प्रसंगी केले. 

सीसीटिव्ही कॅमेरा संनिरीक्षण प्रकल्पाचे उद्‌घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात राज्याचे गृह राज्यमंत्री देशमुख यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, नागेंद्र परब, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी गृह राज्यमंत्री देशमुख म्हणाले, ""सुरक्षितता आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पूर्वी शहरांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येत होते; मात्र सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाने संपूर्ण जिल्हा सीसीटिव्हीच्या देखरेखी खाली आणले आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी, कायदा व सुव्यवस्ता राखण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे हे उपयुक्त आहे. संपूर्ण जिल्हा सीसीटिव्ही कॅमेरेच्या देखरेखीखाली असणारा सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला. सध्याच्या कोरोनाच्या काळा जिल्ह्यातील पोलीस दल, महसूल यंत्रणा आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाचे मला कौतुक आहे.'' 

पालकमंत्री सामंत म्हणाले, ""डीपीडीसीमधून मिळालेल्या निधीचा सदुपयोग जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी चांगल्या प्रकारे केले आहे. ही यंत्रणा जिल्ह्यासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासोबतच यामुळे जिल्ह्याच्या विकासालाही चालना मिळणार आहे.'' यावेळी खासदार राऊत यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्ममातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचेही सांगितले. 

अधुनिक यंत्रणा 
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, ""सर्व यंत्रणा ही हायस्पीड फायबर ऑप्टिक्‍स नेटवर्कने जोडलेली आहे. आताचे 280 आणि पूर्वीचे 158 असे एकूण 438 कॅमेरे संपूर्ण जिल्ह्यात बसविण्यात आले आहेत. हे 4 मेगापिक्‍सल कॅमेरे असल्यामुळे रस्त्यावरील सर्व हालचालींचे स्पष्ट चित्रण करणे शक्‍य होणार आहे.'' पोलिस अधीक्षक गेडाम यांनी स्वागत केले. पोलिस उपनिरीक्षक श्रीमती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. 

आमदार राणेंकडून केसरकरांचे कौतुक 
सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. सीसीटिव्ही कॅमेरामुळे सुरक्षिततेच्या क्षेत्रातही आघाडीवर राहणार आहे. याचे पुर्ण श्रेय हे माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आहे. त्यांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्हा पोलिस दलाला निधी आणि जिल्हा सुरक्षेच्या क्षेत्रात अग्रेसर असल्याच्या शब्दात आमदार राणे यांनी केसरकर यांचे कौतुक केले.