आरोग्य प्रशासनाला मोठा हातभार, जिल्हाधिकाऱ्यांनीही मानले आभार

प्रशांत हिंदळेकर
Tuesday, 15 September 2020

या सेंटरमधील सुविधांमुळे कोरोनाचे रुग्ण 100 टक्के बरे होऊन घरी जातील, अशी आशा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे व्यक्त केली. 

मालवण (सिंधुदुर्ग) - कोरोनावर मात करून आता समर्पित कोविड सेंटरमार्फत कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर व निलक्रांती सहकारी संस्थेची मी देशाच्यावतीने आभार मानते. दर्जात्मक सुविधा असणाऱ्या या समर्पित कोविड सेंटरचा आरोग्य प्रशासनाला मोठा हातभार लागणार आहे. या सेंटरमधील सुविधांमुळे कोरोनाचे रुग्ण 100 टक्के बरे होऊन घरी जातील, अशी आशा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे व्यक्त केली. 

रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि निलक्रांती सहकारी संस्थेचा संयुक्त उपक्रम असलेल्या कांदळगाव येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्राचे लोकार्पण जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत आज झाले. यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर, विश्‍वस्त रविकिरण तोरसकर, तहसीलदार अजय पाटणे, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील, नगरसेवक नितीन वाळके, कांदळगाव सरपंच उमदी परब, माजी सभापती उदय परब, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. रामचंद्र चव्हाण तसेच हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते. 

कोकणात प्रथमच अशा प्रकारचे समर्पित कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांपासून ते मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांसाठी आवश्‍यक त्या उपचार यंत्रणेची सोय उपलब्ध केली आहे. कोरोना विरोधातील लढाईत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला असून या सेंटरद्वारे प्रशासनाला सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे डॉ. विवेक रेडकर यांनी सांगितले. यावेळी रविकिरण तोरसकर यांनी सेंटरमधील सोयी सुविधांबाबत माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. 

महत्त्वाचे सेंटर 
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या, ""कोरोनावरील लसीच्या चाचणीतही हे सेंटर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सेंटरसह देशातही खासगी, वैद्यकीय संस्था समर्पित कोविड सेंटरसाठी पुढे येत आहेत. अशा सेंटरसाठी शासनाकडून मार्गदर्शक तत्वे व सूचना दिल्या जात आहेत. रेडकर हॉस्पिटलने समर्पित कोविड सेंटरद्वारे सुरु केलेली सेवा मालवणसह जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.''  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: inauguration of corona center at kandalgaon konkan sindhudurg