खुषखबर ! सावंतवाडीतून एसटी फेऱ्यांत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

सद्यस्थितीत ग्रामीण भागातून होणारी मागणी लक्षात घेता तालुक्‍यातील ग्रामीण भागातील स्थानिक बस फेऱ्यांत वाढ केली आहे. सध्या येथील आगारातून 184 फेऱ्या सुरू आहेत.

सावंतवाडी -  गणेशोत्सव जवळ येत असल्याने गावागावातील मागणीनुसार येथील आगारातून बस फेऱ्यांत वाढ केली आहे. सोमवारी (ता.17) सावंतवाडी, दोडामार्ग, बांदा स्थानकातून 22 बस फेऱ्यात वाढ झाली. गणेशोत्सव काळात मुंबई, पुणे, डोंबिवली, ठाणे याठिकाणी परतीच्या बस फेऱ्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक मोहनदास खराडे यांनी दिली. त्यामुळे चाकरमानी तसेच शहराकडे येणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 

सद्यस्थितीत ग्रामीण भागातून होणारी मागणी लक्षात घेता तालुक्‍यातील ग्रामीण भागातील स्थानिक बस फेऱ्यांत वाढ केली आहे. सध्या येथील आगारातून 184 फेऱ्या सुरू आहेत. लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळाल्यांनातर काही गावात एसटी फेऱ्या सुरू केल्या होत्या; मात्र काही गावात एसटी सुरू नसल्याने तेथील लोकांना शहराच्या ठिकाणी खरेदीसाठी येण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सध्या गणेशोत्सव अवघ्या दिवसांवर असल्याने ग्रामीण भागातील लोकांचे शहराच्या ठिकाणी खरेदीसाठी तसेच बॅंक इतर कामकाजासाठी येताना अनेक संकटे येत आहेत. त्यामुळे गावागावातून गणेशोत्सव अगोदर बस सुरू करण्यासाठी निवेदने दिली होती. त्या निवेदनानुसार एसटी फेऱ्यांत वाढ केली आहे. 

येथील आगरातून सोमवारी पागावाडी ओटवणे, भटपावणी, फुकेरी, दोडामार्ग, पिकुळे, शिरोडा, असनिये, दाभिळ, कणकवली, फुडब्रिज, कास अशा अपडाउन बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा ग्रामीण भागातून येणाऱ्या जनतेला होणार आहे. गणेशोत्सवानंतर परतीसाठी 24 ते 30 ऑगस्ट बोरिवली, मुंबई, पुणे याठिकाणी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. प्रवास करतेवेळी एसटीमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेऊन 22 प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. 22 प्रवाशांनी ग्रुप बुकींग करणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या तिकीटामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली आलेली नाही. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, तसेच मास्क व सॅनिटायझर याचा वापर करून आगाराला सहकार्य करावे, असे आवाहन आगार व्यवस्थापक खराडे यांनी केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase In ST Rounds In Sawantwadi Sindhudurg Marathi News