कोरोनाने घाबरवले पण कोंबडीने सावरले...

नागेश पाटील | Monday, 3 August 2020

महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यवसाय बळकट होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.

चिपळूण : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यात इंटेसिव्ह पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. तालुक्यात 2425 स्वयंसहाय्यता समूह, 112 ग्रामसंघ व 7 प्रभागसंघाच्या माध्यमातून 26550 महिलांचे संघटन तयार झाले आहे. तालुक्यातील सुमारे 400 समुहाच्या महिला कुक्कुटपालनात सहभागी आहेत. त्यांनी 13 हजार पिलांची खरेदी केली आहे. आता त्यांची विक्री सुरू असून आगामी 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत सुमारे 56 लाखांची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
 
महिलांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यवसाय बळकट होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लॉकडाउनमुळे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी कमी झाल्या. या बचत गटाचा फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी व बँक अर्थसहाय्यातून मिळालेल्या निधीचा वापर विविध व्यवसायासाठी केला जात आहे. तालुक्यातील सुमारे 400 गटाच्या महिलांनी लॉकडाउन काळात (एप्रिल व मे) पक्षांची विक्री व अंडी विक्री यातून 20 लाखापर्यंतचे उत्पन्न मिळवले. 27 मार्च ते 21 जुलै दरम्यान या महिलांना 13 हजार 1 दिवसीय पिल्ले पुरविण्यात आली. यातून पुढील 3 ते 6 महिन्यात मांस व अंडी उत्पादनातून 65 लाखापर्यंतची उलाढाल अपेक्षित आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो ऑनलाइन अर्ज करा ; आता अकरावी प्रवेशाचा मार्ग होणार सुकर...

मार्चमधील पहिल्या बॅचमधील पिल्ले घेतलेल्या महिलांचे 3 महिन्यात उत्पादन व उत्पन्न सुरू झाले. वयोमानानुसार उर्वरित बॅचचे उत्पादनही होणार आहे. नोव्हेंबर 2020 अखेर 65 लाखांपर्यतची उलाढाल होईल. सर्व खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न 30 ते 35 लाख महिलाच्या हाती येणार आहे. या कामी गावपातळीवरील लोकप्रतिनिधी व ग्रामकृतीदलाचे सहकार्य मिळाले. महिलांनी पहिल्या बॅचमधील तयार झालेल्या पक्षांची आषाढ अमावस्येनिमित्त विक्री केल्याने चांगला दर मिळाला. परिणामी या महिलांचे मनोबल वाढण्यास मदत झाली. महिलांच्या यशस्वी प्रयत्नांमुळे कुक्कुटपालन व्यवसायाकडे आर्थिक दृष्टीकोनातून बघण्याचा कल वाढत आहे. 

हेही वाचा -  पोस्टामुळे रक्षाबंधनाचे नाते कोरोनातही होतेय अधिक घट्ट..

पंचायत समितीत दोन वर्षापासून झालेल्या कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा महिलांना फायदा झाला. महिलांना पक्षी वेळेत मिळण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सभापती धनश्री शिंदे, बीडीओ सरीता पवार, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल काटकर, विस्तार अधिकारी भास्कर कांबळे, पी. ए. घोडके व पी. एम. वायदांडे आणि सर्व प्रभाग समन्वयकांनी योगदान देत महिलांना सहकार्य केले.  

कोरोनामुळे विविध ठिकाणी रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या कठिण परिस्थितीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम कुक्कुटपालन व्यवसायातून शक्य होत आहे. 
नितीन माने, प्रकल्प संचालक, जिल्हा परिषद, रत्नागिरी 
 

26 हजार 550 महिलांचे संघटन

पिलांच्या विक्रीतून 56 लाखाच्या उलाढालीचा अंदाज

खर्च वजा जाता 30 ते 35 लाख मिळणार उत्पन्न

कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा फायदा

संपादन - स्नेहल कदम