जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदानाचा टक्का गेल्यावेळच्या तुलनेत पाचने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण ६७.५५ टक्के इतके मतदान झाले. २०१२ मध्ये हेच मतदान ६२ टक्के होते. सर्वात कमी ६२.४५ टक्के दोडामार्ग तालुक्‍यात तर सर्वाधिक ७१.७९ टक्के मतदान वेंगुर्ले तालुक्‍यात झाले.

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदानाचा टक्का गेल्यावेळच्या तुलनेत पाचने वाढला आहे. जिल्ह्यात एकूण ६७.५५ टक्के इतके मतदान झाले. २०१२ मध्ये हेच मतदान ६२ टक्के होते. सर्वात कमी ६२.४५ टक्के दोडामार्ग तालुक्‍यात तर सर्वाधिक ७१.७९ टक्के मतदान वेंगुर्ले तालुक्‍यात झाले.

जिल्ह्यात काल (ता. २१) मतदान झाले. उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नव्हती. तालुक्‍याच्या ठिकाणी गावोगाव असलेल्या केंद्रामधून रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान यंत्र आणली जात होती. यानंतर त्या पेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवून आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच प्रमुख पक्ष जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढले. सर्वांनी प्रचाराचा जोर केला होता. यामुळे निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मतदानही जास्त झाल्याने ही उत्सुकता ताणली गेली आहे. आंब्रड, नेरुर, पिंगुळी, उभादांडा, ओरोस बुद्रुक आदी ठिकाणी दिग्गज उमेदवार रिंगणात असूनही चुरस निर्माण झाल्याने सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या २०१२ मध्ये झालेल्या मतदानात ६२ टक्के जणांनी सहभाग घेतला होता. या वेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. शिवाय मतदार यादीतील दोष दूर करण्यासाठी वारंवार पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. विविध राजकीय पक्षांनीही अधिकाधिक मतदारांना हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त केले. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारी ५ टक्‍क्‍याने वाढली आहे.

५ लाख ६३ हजार ६३२ पैकी ३ लाख ८० हजार ७११ मतदारांनी हक्क बजावला. यात १ लाख ९४ हजार २४२ पुरुष तर १ लाख ८६ हजार ४६९ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २ लाख ८३ हजार ५४१ तर पुरुष मतदारांची संख्या २ लाख ८० हजार ९१ एवढी आहे. टक्केवारीचा विचार करता महिलांपेक्षा पुरुषांनी अधिक प्रमाणात मतदान केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान वेंगुर्ले तालुक्‍यात (७१.७९ टक्के) तर सर्वात कमी दोडामार्ग तालुक्‍यात (६२.४५ टक्के) इतके झाले.

Web Title: Increased percentage of voting district