देवघरात तिरंग्याची पूजा; भारताचा नकाशाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

देवघरात तिरंग्याची पूजा; भारताचा नकाशाही

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत घराघरांत झेंडा फडकेल. मात्र, रत्नागिरीतील थिबा पॅलेस रोड येथील संजीवनी विलणकर या त्यांच्या देवघरात भारताचा नकाशा व तिरंगा ध्वजाची पूजा दीर्घकाळ करीत आहेत. ‘मनामनांत हिंदुस्थान, घराघरांत हिंदुस्थान’ या घोषवाक्यातून भारतमातेचे घराघरांत पूजन करावे, असे आवाहनही विलणकर यांनी केले.

‘महावितरण’च्या सेवेतून निवृत्त झाल्यावर विलणकर यांना कंपनीकडून चांदीचे नाणे देण्यात आले. त्या नाण्यापासून त्यांनी देशाचा नकाशा आणि तिरंग्याची एकत्रित प्रतिमा तयार करून घेतली आणि २०१२ पासून त्या आपल्या देवघरात त्याचे नित्यनेमाने पूजन करत आहेत. वडील राजाराम विलणकर यांनी १९४२ पासून ते १९९६ पर्यंत रत्नागिरीतील खडपेवठार येथील घरात देशभक्तीची खऱ्‍या अर्थाने सुरवात केली. आजही विलणकर यांना दरमहा मिळणारी पेन्शन वर्षाअंती घेऊन त्यातून लहान-मोठ्या आकाराच्या तिरंगा आणि हिंदुस्थानच्या नकाशाच्या प्रतिमा तयार करून शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, अधिकारी, संपर्कात येणाऱ्‍या व्यक्तींना भेट देत आहेत. आपल्याप्रमाणे सर्वांनी ही प्रतिमा देवघरात बसवून देशाचे स्मरण करावे, असे आवाहनही त्या करत आहेत. विशेष म्हणजे आपल्याला मिळणार शेवटची पेन्शनही या कार्यासाठी वापरणार असल्याचे विलणकर यांनी सांगितले.

‘मनामनात हिंदुस्थान, घराघरात हिंदुस्थान’ देशातील प्रत्येक घराघरात भारतमातेची पूजा व्हायला हवी, शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांसमोर हिंदुस्थानचा नकाशा आणि तिरंगा समोर असायला हवा. त्यामुळे देशप्रेम निर्माण होईल. विलणकर यांनी देशप्रेम घराघरांत पोहोचवले आहे.

ज्या मातीने जन्म दिला..

विलणकर यांनी आपल्या घरात देशविदेशातील असंख्य ठिकाणच्या मातीचा संग्रह केला आहे. त्यांच्या संपर्कात असणाऱ्‍या सर्वांकडे विलणकर फक्त मातीचीच भेट मागतात. मिळणारी माती चाळूनघोळून काचेच्या स्वच्छ बरणीत ती भरून ठेवतात. देवघरात त्या मातीची पूजा न चुकता आजही केली जाते. ज्या मातीने जन्म दिला, ज्या मातीने जगवले, तिच्यामुळेच आपले अस्तित्व आहे. तिच्या रक्षणासाठी जवान सीमेवर लढतो आहे. तिच्याबद्दल प्रत्येकाला आदर असलाच पाहिजे, याच उदात्त हेतूने त्यांनी हा संग्रह केला आहे.

एक नजर..

२०१२ पासून नित्यनेमाने पूजन

वडिलांकडून देशभक्तीचा वारसा

पेन्शनमधून तिरंग्याच्या प्रतिमा

संपर्कातील लोकांना देतात भेट

शेवटची पेन्शनही यासाठी वापरणार