छत्तीसगडमधील मोहम्मद फैज करतोय गोरक्षणासाठी भारत परिक्रमा

तुषार सावंत
मंगळवार, 26 मार्च 2019

मोहम्मद पैगंबरांनी जो संदेश दिला होता तो गोमाता वाचवण्याचा होता. गाय रक्षणासाठी जात आणि धर्माची आवश्‍यकता नाही, ते आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा खरा संदेश आम्ही जनमानसात पोचवत आहोत. देशात धर्म परिवर्तनाच्या धंदा सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

- मोहम्मद फैज खान

कणकवली - धर्माने मुस्लिम पण उद्देश मात्र एकच केवळ प्रेम करा आणि रक्षण करा ते सुद्धा केवळ गो मातेवरच. गाईचे पालन करा आपल्या परिवारासाठी आणि रोगमुक्त व्हा. हा संदेश घेऊन गोसेवा सद्‌भावना पदयात्रेवर निघाले आहेत ते छत्तीसगड रायपूर येथील मोहम्मद फैज खान. त्यांनी 24 जून 2017ला लेह (लद्दाख) येथून भारत परिक्रमा यात्रा सुरू केली आहे.

दोन वर्षात 12 हजार किलोमीटर गाव आणि शहरातून जाणारी ही पदयात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. गेल्या 21 महिन्यांमध्ये साडेदहा हजार किलोमीटर पायी चालत असताना खान यांनी देशभरातील 250 जिल्हे 16 राज्यातून हा प्रवास सुरू केला आहे. सध्या ते गोव्यातून सिंधुदुर्गात ही पदयात्रा घेऊन निघाले होते. काल (ता.25) त्यांनी कणकवलीत वास्तव्य केले. दिवसाला पंचवीस ते तीस किलोमीटर असा प्रवास करत असताना वेगवेगळ्या घटकांना भेटी देऊन गोरक्षणाचा संदेश ते समाजापर्यंत पोहोचवत आहेत.

मोहम्मद फैज खान हे 38 वर्षांचे असून विज्ञान महाविद्यालयांमध्ये ते प्रोफेसर होते. पाच वर्षांपूर्वी सरकारी महाविद्यालयातील नोकरी सोडून फैज खान यांनी पूर्णवेळ गोमाता संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील मुसलमान बांधवांना जागृत करण्यासाठी आणि मोहम्मद पैगंबरांचा संदेश पोहोचवण्यासाठी ते पदयात्रा वर निघाले आहेत. पहिल्या टप्प्यात लेह ते कन्याकुमारी आणि दुसऱ्या टप्प्यात कन्याकुमारी ते अमृतसर अशी पदयात्रा सुरू आहे.

दक्षिणेकडून गोवा आणि महाराष्ट्रात दाखल झालेल्या खान यांच्यासोबत गाजीपुर येथील किसन राय आणि उत्तर प्रदेशातील पियुष राय, राजस्थानमधील कश्‍यप वैष्णव हे सहकारी आहेत. सावंतवाडी, बांदा, कुडाळ, ओलोस, कसाल असा प्रवास करत खान सोमवारी सायंकाळी कणकवलीत दाखल झाले होते. ते म्हणतात, भारतभरच्या प्रवासामध्ये अनेक अनुभव आले. शाळा-महाविद्यालयांमध्ये व्याख्यान देत असताना 10 लाखापेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला.

उद्देश एकच होता कॅन्सर मुक्त होण्यासाठी शेतात गायीच्या शेनाचा खत म्हणून वापर होणे फार गरजेचे आहे. मात्र राष्ट्रीय माध्यमांनी गायीचा विषय इतका ताणून धरला आहे की, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. या देशातील प्रसिद्ध असे लोक ज्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ब्रॅंड अँबेसिडर असलेले

सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान हे विषाचे ब्रॅंड अॅम्बेसिडर आहेत. मात्र, मोहम्मद फैज खान हे गाय वाचवणारे ब्रॅंड अम्बेसिडर आहेत असे ते अभिमानाने सांगतात.

मोहम्मद पैगंबरांनी जो संदेश दिला होता तो गोमाता वाचवण्याचा होता. गाय रक्षणासाठी जात आणि धर्माची आवश्‍यकता नाही, ते आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी आहे, हा खरा संदेश आम्ही जनमानसात पोचवत आहोत. देशात धर्म परिवर्तनाच्या धंदा सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी नव्या पिढीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

- मोहम्मद फैज खान

भारतीय संस्कृती विसरू नका असा संदेश देत असताना कोकणातील प्रत्येक घरासमोर असलेली तुळस हे आरोग्याचे मोठे दैवत आहे. त्याचे रक्षण झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यानिमित्ताने समाजासमोर मांडली आहे. यावेळी संदीप राणे, सुनिल सावंत, भाऊ राणे, प्रसाद राणे, श्री. केसरकर आदी उपस्थितीत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Parikrama Yatra for the message of protection for Domestric Cow