'हे' मुळनिवासी भारतीय सेलिब्रेटी कोरोना विरोधात उतरलेत मैदानात...

मयूरेश पाटणकर
मंगळवार, 26 मे 2020

मेन्सएक्सपीची यादी : गुहागरचा सुपत्र डॉ. गोखलेंचा समावेश

गुहागर - जगभरातील डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत तज्ज्ञ मंडळीही फैलावलेल्या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लढा देत आहेत. प्रसंगी त्यापैकी काहींचे प्राणही गेले आहेत. अशा काळात स्वत:च्या क्षेत्रात उत्तम किर्ती मिळवून यशस्वी असलेले लोक कोरोनाविरुध्द लढाईत वैद्यकीय सेवा देण्यास उतरले आहेत.  मेन्सएक्सपी या संस्थेने प्रसिध्द केलेल्या सेलिब्रेटीच्या यादीत गुहागरचा सुपुत्र डॉ. आशिष गोखले याच्यासह आयरीश पंतप्रधान,  भारतीय वंशाच्या ब्रिटीश सुंदरीचा समावेश आहे.

मेन्सएक्सपी संस्थेने प्रसिध्द केलेल्या यादीत प्रथम क्रमांकावर आहेत वेळणेश्र्वरचे डॉ. आशिष गोखले.  अभिनयाची आवड असलेले डॉ. आशिष गोखले कोरोना संकटापूर्वी चित्रपटसृष्टीतील कामात व्यस्त होते. लॉकडाऊनची घोषणा झाल्यावर या क्षेत्रातील काम थांबले.  मात्र घरी न बसता डॉ. आशिष गोखले गेले ३ महिने एका खासगी रुग्णालयात रुग्णसेवा करत आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहेत आयरीशचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचे. 2013 नंतर राजकारणात व्यस्त असलेले डॉ. लिओ कोरोनाच्या संकटात आठवड्यातील एक दिवस रुग्णालयात काम करतात.  डॉ. लिओ वराडकरांचे मुळ गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वराड (ता. मालवण) डिसेंबर 2019 मध्ये ते वराडला येवून गेले होते.

वाचा - कोरोनासह जगण्यासाठी जर्मनी सज्ज होतेय : अनुभव सातासमुद्रापारचे

बॉलिवूडमधील अभिनेत्री शिखा मल्होत्राचाही या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीकर शिखा मल्होत्राने वर्धमान महाविर मेडीकल कॉलेजमधुन नर्सींगची पदवी घेतली आहे. सध्या ती बाळासाहेब ठाकरे ट्रामा हॉस्पिटलमध्ये नर्सिंग ऑफीसर म्हणून कार्यरत आहे. ब्रिटीश टीव्हीमध्ये लेखक आणि अँकर म्हणून काम करणारे रणजीत सींग बालरोगांवरील आपात्कालीन औषध या विषयातील तज्ञ आहेत. सध्या ब्रिटीश टि.व्हि मधील कामाबरोबरच डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. पाचव्या क्रमांकावर आहे 2019 ची मिस् इंग्लंड भाषा मुखर्जी. नॉटिंगहम विद्यापीठातून श्र्वसनशास्त्राची पदवी मिळविलेली भाषा मुखर्जी इंग्लडमध्ये कोरोना संकट आले तेव्हा भारतात होती. इंग्लडमधील परिस्थिती अधिक खराब होऊ लागली तेव्हा ती स्वगृही परतली. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सना पीपीई किटस् देणगी म्हणून दिली. याशिवाय स्वत: एका हॉस्पिटलमध्ये भाषा मुखर्जी काम करत आहेत.

सारे मुळनिवासी भारतीय

मेन्सएक्सपीने प्रसिध्द केलेल्या ५ कोरोना योध्दांच्या यादीमध्ये २ भारतीय, १ आयरीश आणि २ ब्रिटीश नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३ परदेशी नागरिक असलेतरी ते भारतातील मुलनिवासी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indigenous Indian celebrities take to the field against Corona