'तळागाळात रोजगार देणारे उद्योग आणणार'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

कुडाळ - स्थानिक रोजगारांना चालना देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. तळागाळातील माणसांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे उद्योग सिंधुदुर्गात आणणार आहे. त्यातील काथ्या उद्योग हा पहिला प्रकल्प आहे. याद्वारे महिला घरबसल्या आर्थिक उन्नती साधतील. यासाठी राज्य शासन मदत करील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

कुडाळ - स्थानिक रोजगारांना चालना देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. तळागाळातील माणसांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे उद्योग सिंधुदुर्गात आणणार आहे. त्यातील काथ्या उद्योग हा पहिला प्रकल्प आहे. याद्वारे महिला घरबसल्या आर्थिक उन्नती साधतील. यासाठी राज्य शासन मदत करील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र लघुउद्योग महामंडळातर्फे राज्याच्या रिसोर्स बेस्ट इंसेन्टीव्ह प्लॅनिंग ऍण्ड डेव्हलपमेंट या पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात काथ्या उद्योगाच्या विकासासाठी उभारण्यात येणाऱ्या काथ्या उत्पादन, प्रशिक्षण व प्रदर्शन केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, क्कॉयर बोर्डाचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, शंकर कांबळी, पुष्पसेन सावंत, जिल्हाधिकारी उदय चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, जान्हवी सावंत, वर्षा कुडाळकर, अभय शिरसाट, नेरुर सरपंच अनन्या हडकर, लघुउद्योग विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक शिवाजी दौड, महाव्यवस्थापक व्ही. डी. कपाटे, आर. डी. मडके, सह व्यवस्थापकीय संचालक एस. एस. सुरवसे, विभागीय व्यवस्थापक अलका मांजरेकर, भगवानराव जगताप, कुमार रजा, प्रसाद धोंड उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, ""काथ्यापासून विविध वस्तू बनविण्यासाठी महिलांसाठी एक मोठे रोजगाराचे दालन सुरू झाले आहे. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात महिला रोजगार करताना दिसत आहेत. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. सिंधुदुर्गातील महिलांनी या क्षेत्रात पाऊल टाकावे. काथ्यापासून विविध वस्तूंच्या माध्यमातून महिला अल्पावधीत पैसे कमावू शकतात. घरबसल्या हा व्यवसाय करण्याची संधी शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्या. या प्रकल्पासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी विशेष प्रयत्न केले.''

कॉयर बोर्ड अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, ""काथ्या हा मौल्यवान प्रकल्प आहे. महिलांनी या व्यवसायाकडे वळावे.'' पालकमंत्री केसरकर म्हणाले, ""काथ्याच्या माध्यमातून येत्या काही वर्षात हजारो महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील 14 केंद्रांवर काथ्या मशिनरी ही गावोगावी दिली जाणार आहे. महिलांनी तयार केलेला माल लघुउद्योग विकास महामंडळ विकत घेणार आहे. सात कोटीचा निधी यासाठी चांदा ते बांदा प्रकल्पांतर्गत वर्ग केला आहे. पोकळ आश्‍वासने आम्ही देणार नाही. उद्योगमंत्र्यांचे काथ्या प्रकल्प होणे हे स्वप्न होते. ते साकारत आहे.''

रवी कुडाळकर, संचलित चिमणी पाखरं डान्स ऍकॅडमी कुडाळ तसेच मृणाल सावंत व अनुष्का सावंत यांचा नृत्याविष्कार झाला. निवेदन राजा सामंत यांनी केले होते.

आंबा-काजू केंद्रही प्रस्तावित
श्री. देसाई म्हणाले, ""सिंधुदुर्गात 14 प्रक्रिया केंद्र मंजूर आहेत. संख्या वाढवायची असतील तर त्यासाठी केंद्र सरकार मदत करेल. काजू वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया केंद्र वेंगुर्ले, मालवणध्ये आंबा प्रक्रिया केंद्र, देवगडमध्ये बांबूवर आधारीत केंद्र, कुडाळ तर सावंतवाडीमध्ये खेळण्याचे प्रकल्प केंद्र साकारून येथील लोकांला रोजगाराची संधी देणार आहे.''

भंगसाळ नदीवर चार कोटींचा बंधारा
सुंदर कुडाळ, स्वच्छ कुडाळमध्ये आता लवकरच चार कोटींचा बंधारा भंगसाळ नदीवर साकारणार आहे. विकासाच्या नावाखाली बढाया मारण्याचे काम आम्ही करत नाही. लवकरच कुडाळला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. फिल्टरेशन प्लांट बसविण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

Web Title: Industries that will bring jobs