पाली-खोपोली राज्य महामार्गावर मराठीची गळचेपी; सूचनाफलक इंग्रजी अन् हिंदीत

board.jpg
board.jpg

पाली : (रायगड) 'आगे रास्ता बंद है, आगे अस्थायी मोड है', 'CAUTION DEEP EXCAVATION, ROAD WORK IN PROGRESS', 'SPEED LIMIT 30 KMPH', 'ROAD AHEAD CLOSED'. या सूचना वाचून नक्कीच लक्षात आले असेल की या कोणत्या तरी रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या आहेत. कदाचित मुंबई, गुजरात, उत्तर प्रदेश अशा ठिकाणच्या रस्त्यावरील असतील. पण, जरा थांबा. या सूचना आहेत, पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) येथील. या मार्गावर लावण्यात आलेले सूचना फलक हे माय मराठीतून नसून चक्क इंग्रजी आणि हिंदी भाषेतून आहेत. त्यामुळे एमएसआरडीसी व रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारास मराठीचे वावडे आहे की काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
    
पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावरून प्रवास करणारे बहुतांश प्रवाशी व वाहनचालक मराठी भाषिक तसेच परिसरातील ग्रामीण लोक आहेत. त्यांना इंग्रजी आणि हिंदी भाषेतील सूचना लवकर लक्षात येत नसल्याने त्यांची गैरसोय होते. इंग्रजी व हिंदीतील सूचना फलकवरील अनेक शब्द व वाक्यच कळत नसल्याने, पुढे नक्की काय धोका किंवा परिस्थिती आहे ते वाहनचालकांना समजतच नाही. अशा वेळी केवळ परिस्थिचा अंदाज घेऊन वाहन चालवावे लागते.

खरे म्हणजे इथे मराठीतून सूचना फलक लावणे आवश्यक होते पण तसे झालेले नाही. सकाळने ही बाब चार दिवसांपूर्वी सर्वप्रथम एमएसआरडीसी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली आहे. त्यावर मराठीतून सूचना फलक लावले जातील असे सांगण्यात आले. तसेच या संदर्भात माहिती घेण्यासाठी गुरुवारी (ता.1) बेग कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुजय पॉल यांना भ्रमणध्वनी केला असता त्यांनी फोन उचलला नाही. मागील ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पध्दतीमुळे महामार्ग रुंदिकरणाच्या कामाची पुरती वाट लागून गेली. 

पावसाळ्यात या मार्गावरील मोठमोठे खड्डे, दगडगोटे, तसेच चिखलाचा राडारोडा झाला आहे. तर अनेक ठिकाणी खड्ड्यात तळी साचली असून अपघाता धोका निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची प्रचंड दुदर्शा झाली आहे. काही महिन्यांपूर्वी एम.एस.आर.डी.सी प्रशासनाने ठेकेदाराची खांदापालट केली. ठेकेदार मोनिका कडून बेग कन्स्ट्रक्शनकडे काम सोपविण्यात आले. मात्र तरीही रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. त्यातच सुरक्षितेसंदर्भात लावलेले सूचना फलक हिंदी आणि इंग्रजीतून लावल्यामुळे मोठा घोळ झाला आहे. 

''मराठीतून सूचना फलक लावण्यासाठी ठेकेदारास सांगण्यात आले आहे. त्यांनी देखील मराठीतून सूचना फलक तयार करण्यास दिले आहेत. दोन-तीन दिवसांत या मार्गावर मराठीतून सूचना फलक लावले जातील.'' 
- सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी

 ''या मार्गावर मराठीतून सूचना फलक लावण्यात यावे यासाठी आम्ही एमएसआरडीसी ला निवेदन देणार आहोत. त्यांना आमच्या मागणीची दखल घ्यावीच लागेल. मराठीतून फलक लावले जातीलच. अन्यथा आम्ही आंदोलन करू''.
- सुनील साठे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सुधागड तालुका

''आपल्याच राज्यात आपलीच माय मराठी जर उपेक्षित राहत असेल तर ही बाब अतिशय निंदनीय आहे. येथे राहणाऱ्या व वास्तव करणाऱ्या प्रत्येकालाच मराठी येते आणि तीच भाषा चांगली समजते. मग या मार्गावर सूचना फलकावर इंग्रजी आणि हिंदी भाषेचा एवढा अट्टाहास का?''
- ह.भ.प. महेश पोंगडे महाराज, वाहन चालक, सुधागड


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com