अजैविक प्रदूषण! समुद्री कचरा जलचरांसाठी मृत्यूचा सापळा

Inorganic pollution ocean malvan konkan sindhudurg
Inorganic pollution ocean malvan konkan sindhudurg

मालवण (सिंधुदुर्ग) - येथील समुद्रात अजैविक घटकांच्या प्रदूषणाचा विळखा घट्ट होत आहे. यामुळे सागरी पर्यावरणाबरोबरच मासेमारीतही अडथळे येत आहेत. येथे नुकत्याच राबवलेल्या सागरी स्वच्छता मोहिमेत हे चित्र प्रकर्षाने पुढे आले. 

गेल्या काही वर्षांत येथील समुद्रात मोठ्या प्रमाणात अजैविक अर्थात विघटन न होणारा कचरा सापडत आहे. यात मोठ्या प्रमाणावर तुटलेल्या जाळ्या, प्लास्टिक बॉटल, पिशव्यांचा समावेश आहे. हा कचरा प्रदूषणाबरोबर समुद्री जीवांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे. बोटींच्या फमध्ये हा कचरा अडकून अपघाताचे धोकेही वाढले आहेत.

येथील चिवला किनारपट्टीवर गेले काही दिवस समुद्रातील हा कचरा सातत्याने किनाऱ्यावर वाहून येत होता. चिवला बीच येथील तरुणांनी पुढाकार घेत समुद्रात स्वच्छता मोहीम राबवली. यात मोठ्या प्रमाणात कचरा गोळा करून किनाऱ्यावर आणण्यात आला. यातून हे चित्र अधिक स्पष्ट झाले. या मोहिमेत स्वीटन रोज, जॉन्सन रोड्रिक्‍स, शुभम मुळेकर, राकेश वेंगुर्लेकर, पार्थ परब, गणपत मयेकर, फान्सिस फर्नांडिस, जॉन्सन फर्नांडिस, मनोज मेतर व अन्य पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. 

येथील किनारपट्टीवरील सर्वांत सुरक्षित किनारा म्हणून चिवला किनाऱ्याकडे पाहिले जाते. याठिकाणी चालणाऱ्या वॉटर स्पोर्टसचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. बोटिंग, पॅरासेलिंग दरम्यान बोटींच्या फॅनमध्ये जाळी अडकण्याचा धोका लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून समुद्री स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

सागरी पर्यटन सफरीवर येणारे पर्यटक पाणी व खाद्यपदार्थ खाऊन रिकाम्या बॉटल, प्लॅस्टिक कव्हर किनाऱ्यावर तसेच समुद्राच्या पाण्यात टाकतात. त्यासोबत तुटलेली माशांची जाळी. सातत्याने येणाऱ्या या कचऱ्यातून समुद्रात मोठ्या प्रमाणात अजैविक अर्थात विघटनशील नसलेल्या कचऱ्याचे साम्राज्य तयार होते. समुद्रात व किनाऱ्यावर आपल्याकडून कचरा होणार नाही याची काळजी पर्यटकांनी घ्यायला हवी, असे आवाहन करण्यात येत आहे. 

चिवला किनारी भागात प्रथमच समुद्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात तुटलेल्या मासेमारीच्या जाळ्या, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आदी प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात सापडला. एकवेळ मोहीम राबवून ही स्वच्छता होणार नाही. यासाठी अनेकवेळा ही मोहीम राबवून हा कचरा काढण्याचे काम येत्या काळात टप्प्याटप्प्याने केले जाईल, असे स्थानिकांनी स्पष्ट केले. 

लाखो टन प्लास्टिक समुद्रात 
बहुसंख्य नद्या सह्याद्रीकडून वेगाने समुद्राकडे येतात. समुद्राच्या जवळ त्यांचे रूपांतर खाडीत होते. त्यांचे पात्र विस्तारते. मोठ्याप्रमाणात प्लास्टिक नद्यांमध्ये पोहोचते. तेथून ते थेट समुद्रात येते. अलिकडच्या काळात पर्यटन वाढत आहे. प्लास्टिक कचरा वाढण्याचे हेही एक कारण आहे. जिल्ह्यात प्लास्टिक निर्मुलनाची सक्षम यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे लाखो टन प्लास्टिक समुद्रात पोहोचले असून तीव्रता वाढत आहे. 

असा साठतो कचरा 
समुद्रापर्यंत पोहोचलेला कचरा ठराविक भागात साठून राहतो. यात प्लास्टिकसारखा तरंगणारा कचरा किनाऱ्याच्या दीड-दोन किलोमीटरच्या भागात वर्षानुवर्षे पडून असतो. सांडपाणी, रासायनिक द्रव हे प्रदूषणकारी घटक नदी, खाडी यांच्या मुखापासून दीड-दोन किलोमीटर भागात साठून राहतो. हाच भाग वन्यजीव प्रजननाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने याचा सागरी जीवसृष्टीवर दुष्परिणाम होतो. 

येथील समुद्र किनारपट्टी भागात सातत्याने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाहून येत असल्याचे दिसून येत होते. या भागात वॉटर स्पोर्टस व्यवसाय असल्याने छोट्या नौकांच्या फॅनमध्ये हा कचरा, मासेमारी जाळ्यात अडकून अपघात घडण्याची शक्‍यता होती. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक तरुणांनी समुद्रात स्वच्छता मोहीम राबविली. 
- फ्रान्सिस फर्नांडिस, चिवला बीच पर्यटन व्यावसायिक 

चिंताजनक बाब 
* दरवर्षी सागराच्या पोटात जाणारा कचरा - 14 अब्ज पौंड 
* मालवाहू जहाजामुळे निर्माण होणारा - 5.5 दशलक्ष टन 
* कचऱ्यातील प्लास्टिकचा वाटा - 80 टक्‍के 
* प्रदूषणाने प्रभावीत प्राणी प्रजातींची संख्या - 267 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com