मोटार नदीत कोसळून तिघा जणांचा मृत्यू

संदेश सप्रे
गुरुवार, 28 जून 2018

संगमेश्‍वर - भरधाव वेगातील मोटारीचा पुढचा टायर फुटून ती नदीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीचा चालक आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वरजवळच्या धामणी येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास अपघात घडला. 

संगमेश्‍वर - भरधाव वेगातील मोटारीचा पुढचा टायर फुटून ती नदीत कोसळली. या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गाडीचा चालक आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्‍वरजवळच्या धामणी येथे आज सकाळी ११.३० च्या सुमारास अपघात घडला. 

६ तासानंतर गाडी शोधण्यात यश आले. गाडी बाहेर काढल्यावर तिन्ही प्रवासी आतमध्येच अडकून पडल्याचे आढळले.
प्रमिला पद्माकर बेर्डे (६२, रा. लांजा), ऋतुजा शैलेश पाटणे (४०) आणि पीयूष शैलेश पाटणे (१२, रा. नवी मुंबई, मूळ गाव धामणंद - खेड) अशी मृतांची नावे आहेत. चालक नितीन लक्ष्मण वाघमारे (३०, कळंबोली - नवी मुंबई, मूळ गाव सातारा) सुखरूप बचावला. 

चालक नितीन मोटारीने (एमएच-०६-एडब्ल्यू-७७७९) पाटणे कुटुंबीयांसह मंगळवारी (ता. २६) लांजा येथे आला. आज सकाळी १० वाजता ही मंडळी नवी मुंबईला निघाली. मोटार संगमेश्‍वरच्या पुढे धामणीजवळ खड्ड्यात आपटली. गाडीचा पुढचा टायर फुटला आणि वेगात गाडी विरुद्ध दिशेला जाऊन ४०० फूट अंतरावरील असावी नदीत कोसळली आणि क्षणार्धात दिसेनाशी झाली. हा प्रकार पाहून महामार्गावरील वाहनचालक व स्थानिकांनी धाव घेतली. पाण्याच्या प्रवाहातून एक माणूस झाडाला धरून ओरडत असल्याचे काहींनी पाहिले. मानवी साखळी करून त्याला बाहेर काढले. तो चालक निघाला.

अपघाताचे वृत्त समजताच संगमेश्‍वर पोलिस आणि राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची गर्दीही वाढली. सर्व प्रकारचा प्रयत्न करूनही मोटारीचा शोध लागत नव्हता. तासाभरात जिल्हा आपत्कालीन पथकही आले. मच्छीमार, पोलिस अधिकारी, महामार्ग पोलिस, राजकीय क्षेत्रातील मंडळी घटनास्थळी ठाण मांडून होती. गाडी कोसळली तिथून जवळच नदीवर मोठा बांध आहे. येथे मोठा डोह आहे. याच डोहात गाडी अडकल्याचा अंदाज करून क्रेनच्या साह्याने गाडीचा शोध सुरू होता. अखेर संध्याकाळी ५ वाजता मोटारीचा शोध लागला. तेव्हा आतील तिघेही मृत्युमुखी पडल्याचे स्पष्ट झाले. 

दृष्टीक्षेपात
 पुढचा टायर फुटून  ४०० फुटांवर 
 चालक आश्‍चर्यकारकरीत्या बचावला

 

Web Title: Inowa train collapses in river, three missing