इन्सुली ग्रामस्थांचे खड्ड्यात बसून आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटापासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्‍यापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात दिवसागणिक एक किंवा दोन अपघात होतात. त्यात काहींना गंभीर दुखापत होते. तर दुचाकीवरून या ठिकाणाहून प्रवास करणे खूपच जिकिरीचे ठरले आहे.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुलीत ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्याविरोधात इन्सुली ग्रामस्थांनी कुडवटेंब येथे खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले. महामार्ग विभागाचे अधिकारी येईपर्यंत सुमारे दोन तास केलेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली. यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी अनिल आवटी यांनी आठ दिवसात खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करतो असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त होता. 

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली घाटापासून जुन्या आरटीओ तपासणी नाक्‍यापर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात दिवसागणिक एक किंवा दोन अपघात होतात. त्यात काहींना गंभीर दुखापत होते. तर दुचाकीवरून या ठिकाणाहून प्रवास करणे खूपच जिकिरीचे ठरले आहे. गेले अनेक महिने खड्डे पडून सुद्धा संबधित विभाग झोपी गेल्याने त्याला जाग आणण्यासाठी इन्सुली ग्रामस्थांनी इन्सुली-कुडवटेंब येथे महामार्गावरील खड्ड्यात बसून आंदोलन केले. यात स्वागत नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात बसून अधिकारी येईपर्यंत आंदोलन करण्यात आले. 

यावेळी स्वागत नाटेकर, माजी सरपंच तात्या वेंगुलेकर, नंदू पालव, नाना पेडणेकर, माजी उपसरपंच सत्यवान केरकर, ग्रामपंचायत सदस्य महेश धुरी, केतन वेंगुर्लेकर, गजानन गायतोंडे, बाबलो झाट्ये, पिंटो हांडेकर, बाळा कापडोसकर, जयराम पालव, रवी परब, हरी तारी, प्रिया नाटेकर, महादेव पेडणेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्या नंतर बांदा पोलीस उपनिरीक्षक ढोबळे, पोलीस कॉन्स्टेबल विकी गवस, वाहतूक पोलीस विजय जाधव दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांना बाजूला जाण्याची विंनती केली मात्र संबधित खात्याचे अधिकारी येईपर्यंत आम्ही हटणार नाही असे सांगत आंदोलक ठाम राहिले. महामार्ग विभागाचे अभियंता अनिल आवटी यांनी आंदोलकांशी चर्चा करून येत्या आठ दिवसात खड्डे बुजवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले; मात्र आठ दिवसानंतर सूचना देणे पूर्वी महामार्ग बंद करण्यात येईल असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Insuli Villagers Sit In A Pit And Agitate Against Pit On Road