कलकाम रिअल इन्फ्रामधील गुंतवणूकदार अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रा या नावाने पतसंस्थासदृश काम करणारी कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. सामान्य गुंतवणूकदारांकडून आकर्षक व्याजावर पैसे घ्यायचे. हे पैसे हॉटेल, व्यावसायिक जागा आणि जमिनींमध्ये गुंतवण्याचे काम कंपनी करत होती. चिपळूणमधील स्वमालकीची कार्यालयाची जागाही कंपनीने विकल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रा या नावाने पतसंस्थासदृश काम करणारी कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आहे. सामान्य गुंतवणूकदारांकडून आकर्षक व्याजावर पैसे घ्यायचे. हे पैसे हॉटेल, व्यावसायिक जागा आणि जमिनींमध्ये गुंतवण्याचे काम कंपनी करत होती. चिपळूणमधील स्वमालकीची कार्यालयाची जागाही कंपनीने विकल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

वेगवेगळे आर्थिक फंडे काढून, कमी कालावधीत जास्त मोबदला देण्याचे आश्‍वासन देऊन सामान्य लोकांना फसविण्याचे अनेक धंदे निघाले. या धंद्यात काही गब्बर झाले, तर काही रसातळाला पोचले. तरीदेखील सामान्य लोकांचा पैशाचा हव्यास काही सुटत नाही. हेच कलकाम रिअल इन्फ्रामधून समोर आले आहे. सदर कंपनीने नोंदणी करताना रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे, त्यासाठी शेअर, बॉण्ड आदी पर्यायांमधून भांडवल उभे करणार असल्याचे शासकीय व्यवस्थेला लिहून दिले आहे.

प्रत्यक्षात या कंपनीने आवर्ती मुदत ठेव (आर.डी.), मुदतठेव अशी व्यवस्था निर्माण केली. सामान्य बेरोजगार तरुणांना भरपूर कमिशनचे गाजर दाखविले. त्याच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी वर्गाकडून पैसे जमा केले; मात्र नोटबंदी आणि रेरा कायद्याने कंपनीचे कंबरडे मोडले. तेव्हापासून ठेव पूर्ण झालेल्यांच्या रक्कमांच्या परताव्यात अनियमितता आली. काही दिवसांत परिस्थिती बदलेले असे आश्‍वासन कंपनीतर्फे प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांना देण्यात येत होते, परंतु जमिनी, दुकानगाळे आणि इमारतींच्या खरेदी-विक्री व्यवहारात मंदी आली. भाव पडले. गेल्या दोन वर्षांत कंपनीसमोरील आर्थिक संकट अधिकच गडद होत आहे. 

यासंदर्भात कंपनीचे अध्यक्ष विष्णू दळवी, संचालक रामचंद्र सुपेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. कंपनीच्या मालकीच्या जागा आम्ही तुम्हाला विकत देतो, असा प्रस्ताव संचालक मंडळाने प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांसमोर ठेवल्याचे एका प्रतिनिधीने सांगितले आहे. 

तोंड दाखवायला जागा नाही
परतावा मिळत नसल्याने सामान्य गुंतवणूकदार प्रतिनिधींकडे पैसे मागत आहेत. तुम्ही आम्हाला फसविले, असे आरोप करत आहेत. त्यामुळे प्रतिनिधींचे, विशेषत: महिला प्रतिनिधींचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. एका महिला प्रतिनिधीने सांगितले, की घरात नातेवाईक व घरातून बाहेर पडल्यावर गुंतवणूकदार सतावतात. पतीबरोबर पैशावरून वाद सुरू झालेत. कोणालाही तोंड दाखवण्यास जागा राहिलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: investor in Kalkam Real Infra In trouble