रत्नागिरी - येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबई विद्यापीठच नव्हे तर जागतिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी गुणवत्ता शिक्षण येथे दिले जाते, हे सिद्ध करण्यासाठी या मानांकनाची गरज आहे. आगामी काळात ग्रंथालय आणि कार्यालयीन विभागांनाही हे मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांनी केले.
पुढील तीन वर्षांसाठी हे प्रमाणपत्र ग्राह्य राहणार आहे. प्रमाणपत्र विज्ञान शाखेच्या पदवी व पदव्युत्तर विभागासाठी आहे. फेब्रुवारीमध्ये याची प्रक्रिया सुरू झाली. अर्ज भरणे, त्यानंतर प्राध्यापकांना प्रशिक्षण, ठराविक पद्धतीने माहिती व सूचनांद्वारे सुधारणा, मानांकनपूर्व तपासणी अशा टप्प्यावर काम करण्यात आले.
‘आयएसओ’चे फायदे
आयएसओ मानांकनामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांतून विविध व्यवसाय, उद्योगाच्या संधी मिळतील. तसेच अन्य देशांतील अभ्यासक्रमाशी सामंजस्य करार करणे शक्य आहे. आयएसओ ही संस्था जिनिव्हा येथे स्थापन झाली.
याकरीता सोलापूरच्या यश कन्सल्टन्सीच्या यशवंत पत्की व लिड ऑडिटर ओंकार पत्की यांचे मार्गदर्शन लाभले. आयएसओ ९००१ मध्ये नमुना, विकास, उत्पादन, उभारणी व सेवा याबद्दल गुणवत्तेची ग्वाही देण्यात येते.क्यूएमएस ०८१८०२०२४७ या क्रमांकांचे प्रमाणपत्र जीएमबीएच जर्मनीमधून मिळाले आहे. कोकणातील अग्रमानांकित असलेल्या गोगटे महाविद्यालयाला हा मान प्रथमच मिळाला आहे. पत्रकार परिषदेला कार्यवाह सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष ॲड. विजय साखळकर, आनंद देसाई, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, आयएओ प्रमाणपत्र समितीचे प्रमुख डॉ. पी. पी. कुलकर्णी, डॉ. राजीव सप्रे, उपप्राचार्य प्रा. विवेक भिडे उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.