बॅंकेतून ८० हजार काढले कोणी, भरले कोणी?

बॅंकेतून ८० हजार काढले कोणी, भरले कोणी?

संगमेश्‍वर - येथील डॉक्‍टरांच्या खात्यातून सुमारे ८० हजार रुपये एटीएम कार्ड वापरून काढण्यात आले. या खात्याचे एटीएम कार्ड नाही. तरीही रक्कम काढली आणि बॅंकेने ती डेबिटही केली. याबाबत विचारणा केली असता ‘पैसे गेले समजा, तुम्ही खाते बंद करा’ असे उत्तर मिळाल्याने ते अवाक झाले. वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर पुढच्या दोन दिवसांत काढली गेलेली सर्व रक्कम पुन्हा खात्यात जमा झाली.

बॅंक ऑफ इंडिया संगमेश्‍वर शाखेच्या डॉ. श्रीकांत सावगावे यांच्या खात्यातील हा घोळ आहे. डॉक्‍टर शाखेमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गेले. आपले ८० हजार रुपये काढण्यात आले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणले. त्यावर ‘हे कसे घडले आम्हाला माहीत नाही, तुमचे खाते बंद करा, आम्ही याला जबाबदार नाही, तुमचे पैसे परत मिळणेही कठीण’ असे सांगण्यात आले. मात्र उद्या वरिष्ठ उपलब्ध होतील, त्यांच्याशी संपर्क करा, असे सुचवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी वरिष्ठांशी संपर्क साधला असता त्यांनी तुमचा प्रश्‍न सोडवला. एटीएमद्वारे काढण्यात आलेले पैसे (८० हजार रुपये) तुमच्या खात्यात भरले. तुम्ही ते आता काढू शकता, असे सांगितले. हा सारा धक्कादायक प्रकार घडल्यावर डॉक्‍टरांनी बॅंक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजरना २८ फेब्रुवारीला पत्र पाठवले आहे. मात्र अद्याप त्यावर त्यांना काहीही उत्तर मिळालेले नाही.

डॉक्‍टरांनी एटीएम कार्डच घेतलेले नसताना १३ ऑगस्टपासून १९ ऑक्‍टोबरपर्यंतच्या काळात कधी १० हजार कधी ५ हजार करीत ८० हजार रुपये काढले गेले. हे पैसे जोपर्यंत भरले गेले नव्हते, तोपर्यंत तो अपहारच होता. ते भरले असले तरी पैशाचा दुरुपयोग तर निश्‍चितच झाला.

यातून बॅंकेच्या विश्‍वासार्हतेबद्दलच प्रश्‍न निर्माण होतो. एटीएमने फसवणूक करून पैसे काढले गेले असतील, तर बॅंकेने ते लक्षात आल्यावर त्याबाबत तक्रार करणे आवश्‍यक होते. मात्र येथे पैसे तक्रारीनंतर त्वरित भरून देण्यात आले. म्हणजे हे कोणाच्या तरी संगनमताने घडले , असा संशय घेण्यास जागा आहे.

दूरध्वनीवर बिपीन साहेब असे नाव सांगणाऱ्यांनी झोनल ऑफिसमधून याबाबत लगतच्या सोमवारी २५ फेब्रुवारीदरम्यान उत्तर देण्याचे कबूल केले. मात्र, आजतागायत मला उत्तर मिळालेले नाही. हा सर्व व्यवहार संशयास्पद वाटतो. माझ्यासारखे आणखी कोणी खातेदार यातून फसविले जाण्याची शक्‍यता आहे. बॅंकेने लवकरात लवकर याचे उत्तर द्यावे.
- डॉ. श्रीकांत सावगावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com