म्हाप्रळ - आंबेत पूल कमकुवत असल्याच्या फलकाने संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण असून फलक लावून वाहतूकही सुरू ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

मंडणगड - रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत-म्हाप्रळ पुलावर दोन्ही बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कमकुवतचा फलक लावण्यात आल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण असून फलक लावून वाहतूकही सुरू ठेवल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. 

सावित्री नदीवर १९८१ ला हा पूल खुला करण्यात आला. या परिसरातील खाडीपात्रात प्रचंड प्रमाणात वाळू उपसा चालतो. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. पुलाची आवश्‍यक डागडुजी झालेली नाही. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभाग महाड व उपविभाग माणगाव यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला डावीकडे लाल रंगांचे सूचना फलक लावले. त्यामध्ये वेगमर्यादा २० कि.मी. प्रतितास अशी नोंद आहे. सावित्री दुर्घटनेनंतर सरकारने महाराष्ट्रातील सर्व पुलांचे ऑडिट करून तत्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या.

मात्र, या पुलाच्या ऑडिटविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ३७ वर्षांत आजपर्यंत पुलाची कोणतीही डागडुजी न झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सामाजिक संस्था, माध्यमांनी वेळोवेळी पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटची मागणी केली; मात्र बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उलट बांधकाम विभागाने असा फलक उभारून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. 

पूल कमकुवत असल्याच्या फलकामुळे यावरून प्रवास करावा की नाही, असा संभ्रम निर्माण होतो. बांधकाम विभागाने याबाबत खुलासा करून प्रवाशांना भयमुक्त करावे. 
- नरेश पातेरे,
व्यावसायिक

Web Title: issue of Mahpall-Ambee bridge