कोकणवासीयांच्या संयमाचा अंत पाहू नका ! 

कोकणवासीयांच्या संयमाचा अंत पाहू नका ! 

मुंबई - मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात आणखी गती आणून कामाचा दर्जा सुधारावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच कोकणी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. कोणाच्याही चुकांमुळे सामान्य जनतेला त्रास झाल्यास सरकार अतिशय कडक कारवाई करेल, असे खडे बोल मंत्री पाटील यांनी यावेळी कंत्राटदार व अधिकाऱ्यांना सुनावले. 

गेले दोन दिवस, भर पावसात मंत्री पाटील यांनी रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ या राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची पाहणी केली. यानंतर कंत्राटदारांच्या काही ठिकाणी अवलंबिलेल्या ढिसाळ कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, महामार्ग अधिकारी वर्गाने अधिक परिणामकारक व जातीने देखरेख करण्याच्या सूचना दिल्या. 

या वेळी कोकणातील रस्त्यांवरील सर्व खड्डे तातडीने बुजवणे, तसेच पावसाचा जोर पाहता अपघात टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात उभारण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याच्या कामाचीदेखील या वेळी मंत्री पाटील यांनी पाहणी केली. या वेळी महामार्गाच्या बांधकामाची कामाची गती वाढवून डिसेंबर 2019 पर्यंत संपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर किमान दोन मार्गिका वाहतूक सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, अशा सक्त सूचना कंत्राटदारांना व महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच कोकणातील जनतेच्या संयमाचा अंत न पाहता, चौपदरीकरणाचे संपूर्ण काम डिसेंबर 2020 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झालेच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश दिले. 

वडखळ बायपास पूल लवकर पूर्ण करण्याचे निर्देश 
पेण - वडखळ - अलिबाग या मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या दूर करण्यासाठी मुंबई - गोवा महामार्गाच्या कामाअंतर्गत बायपास पूल उभारण्यात येत असून, यापैकी पूर्ण झालेल्या पुलाच्या एका मार्गिकेची मंत्री पाटील यांनी आज अभियंत्यासमवेत पाहणी केली. सुमारे 3.50 किमी अंतराच्या या बायपास पुलामुळे पेण - वडखळ - अलिबाग दरम्यानच्या वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असून, कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या पुलाच्या पाहणीनंतर दुसरी मार्गिकादेखील जलद गतीने पूर्ण करून हा पूल लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुला करा, असे निर्देश मंत्री पाटील यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले. 

कशेडी घाटातील प्रवास होणार जलद व सुरक्षित 
मुंबई - गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा कशेडी घाट हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या घाटातील धोकादायक वळणांमुळे अनेक जीवघेण्या अपघाताच्या घटना घडतात. या दुर्घटना टाळण्यासाठी आणि चाकरमान्यांचा प्रवास कमी वेळात, सुखकर व सुरक्षित करण्यासाठी 1.80 आणि 1.90 किमीचे दोन स्वतंत्र बोगदे बनविण्याचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्णत्वास जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com