सिंधुदुर्गातील बड्या राजकीय हस्तीची रिफायनरी परिसरात तीनशे एकर जागा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

राजापूर - ""रिफायनरी प्रकल्पग्रस्त गावांमध्ये सिंधुदुर्गातील बड्या राजकीय हस्तीची सुमारे तीनशे एकर जागा आहे,'' असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला. विनाशकारी प्रकल्प पुन्हा कोकणात आणण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना शांत बसणार नाही. रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध पाहायचा असेल तर, मुख्यमंत्र्यांनी या चौदा गावांमध्ये यावे, असे आव्हानही तारळ येथील प्रकल्पविरोधी बैठकीमध्ये दिले. 

राजापूर - ""रिफायनरी प्रकल्पग्रस्त गावांमध्ये सिंधुदुर्गातील बड्या राजकीय हस्तीची सुमारे तीनशे एकर जागा आहे,'' असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला. विनाशकारी प्रकल्प पुन्हा कोकणात आणण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना शांत बसणार नाही. रिफायनरी प्रकल्पाला असलेला विरोध पाहायचा असेल तर, मुख्यमंत्र्यांनी या चौदा गावांमध्ये यावे, असे आव्हानही तारळ येथील प्रकल्पविरोधी बैठकीमध्ये दिले. 

राऊत म्हणाले, ""सौदीच्या कंपन्यांना पोसण्यासाठी आणि दलालांचे खिसे भरण्यासाठी नाणार रिफायनरी प्रकल्प पुन्हा कोकणात आणला जात आहे. भाजप सरकार कोकणतील सिंचन प्रकल्पांना निधी देत नाही, मत्स्य दुष्काळ जाहीर करत नाही, काजू, नारळ पिकांना भाव देत नाही; मात्र कोकणचा विनाश करणारा रिफायनरी प्रकल्प उभारण्यासाठी आग्रही आहेत, ही बाब दुर्दैवी आहे. प्रकल्पविरोधकांच्या एकजुटीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये रिफायनरीचे श्राद्ध घालून तो रद्द केला. आता तो पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करण्यामागचे नेमके कारण काय? असा हट्टाहास केला जात असेल तर, जनता गप्प बसणार नाही. प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा नव्याने प्रकल्पविरोधात ठराव मांडून शासनासह पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रकल्पसमर्थकांपर्यंत प्रकल्पविरोध असल्याचे पुन्हा एकदा साऱ्यांनी दाखवून द्यावे.'' 

""हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या प्रकल्प समर्थकांनी फलक झळकावले. ते पाहून मुख्यमंत्र्यांकडून रिफायनरीचा फेरविचार करण्याचे वक्तव्य केले जाते, हे दुर्दैवी आहे,'' असे आमदार साळवी यांनी सांगितले. प्रकल्पविरोधी संघटनेचे सामंत म्हणाले, ""प्रकल्पाला विरोध आहे की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी चौदा गावांमध्ये येऊन आमने-सामने चर्चा करून ठरवावे.''

नंदकुमार कुलकर्णी म्हणाले, ""हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या समर्थकांना भुलून मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पविरोधकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, मात्र जनता गप्प बसणार नाही.'' 

यावेळी दिनेश जैतापकर, प्रकाश कुवळेकर, चंद्रप्रकाश नकाशे, कमलाकर कदम, मजीद भाटकर, सचिव भाई सामंत, संजय राणे, कल्पना मोंडे, सोनाली ठुकरूल, मंदा शिवलकर, सोनम बावकर, दुर्वा तावडे, सुभाष गुरव आदींसह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. 

नाणार परिसरात चर्चा सुरू 
""रिफायनरी प्रकल्प परिसरात जागा खरेदी करणाऱ्या गुजरातमधील दलालांची यापूर्वी नावे जाहीर केली आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्गातील बड्या हस्तीचे व याही दलालाचे नाव योग्य वेळ येताच जनतेसमोर जाहीर करू,'' असे राऊत यानी सांगितले. त्यामुळे रिफायनरी भागात जागा असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बडी राजकीय हस्ती कोण, याची चर्चा सुरू झाली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Nanar refinery project in Ratnagiri