राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना

राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना

देवगड - भाजप कार्यकर्त्यांनी आजवर विविध बाबतीत सहन केलेला त्रास, अन्याय तसेच कार्यालयावर झालेली अंडीफेक कार्यकर्ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्‍चितच समजून घेऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘त्यांच्या’ भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतील, असा विश्‍वास भाजप नेते अतुल रावराणे यांनी कुणकेश्‍वर येथे पत्रकारांशी बोलताना 
व्यक्‍त केला.

श्रावण सोमवारानिमित्त श्री. रावराणे यांनी कार्यकर्त्यांसह श्री देव कुणकेश्‍वरचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, उद्योजक नंदकुमार घाटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, तालुका सरचिटणीस संजय बांबुळकर, रवींद्र तिर्लोटकर, पंचायत समिती सदस्य सुनील पारकर, नगरसेवक सुभाष धुरी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेश होण्याच्या वृत्ताच्या अनुषंगाने रावराणे यांना प्रश्‍न विचारताच ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान सांगितले आहेच की ‘ताकाला जाऊन भांडे लपवायचे नाही’.

श्री. राणे युतीमध्ये आल्यास आपल्याला आवडेल, भाजपमध्ये आल्यास असे त्यांनी म्हटलेले नाही. आज जिल्ह्यात भाजप नंबर वन पक्ष आहे. कार्यकर्त्यांची ताकद प्रचंड वाढलेली आहे. शासनाच्या माध्यमातून कामे होत असल्याने अनेकजण भाजपकडे आकर्षित होत आहेत. कार्यकर्त्यांच्या हिमतीवर निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष सज्ज आहे. यावेळी ॲड. गोगटे यांनी, भाजपमध्ये ‘येणार आणि आले’ यामध्ये फरक असल्याची प्रतिक्रिया दिली.

चिखल उडवण्याची भाजपची परंपरा नाही
चिखलातून कमळ फुलवण्याची भाजपची संस्कृती असून कोणावर चिखल उडवण्याची नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय होईल, असे श्री. रावराणे यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना...
कार्यकर्त्यांवर निधीसह झालेला अन्याय तसेच जामसंडे येथील भाजप कार्यालयावर झालेली अंडीफेक कार्यकर्ते विसरलेले नाहीत. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील, यात शंका नाही. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवल्या असून कार्यकर्त्यांना अपेक्षित असणारा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असा कार्यकर्त्यांना विश्‍वास आहे, असेही रावराणे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com