नॅशनल हायवे ऑथोरिटीसह ‘बांधकाम’वर कारवाई शक्‍य - ॲड. पेचकर

नॅशनल हायवे ऑथोरिटीसह ‘बांधकाम’वर कारवाई शक्‍य - ॲड. पेचकर

चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजविण्यात नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हलगर्जी केली असेल तर कोर्ट कमिशनरची नेमणूक करून दोघांवर कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई उच्च न्यायालयाकडून काल देण्यात आला. ॲड. ओव्हीस पेचकर यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली.

ते म्हणाले, की महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबत नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग गंभीर नसल्याने मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त करण्याची सूचना न्यायालयाने केली. ५ सप्टेंबरपूर्वी महामार्ग खड्डेमुक्त होईल, असे आश्‍वासन सरकारने दिले. त्यानंतर मी ८ ते ९ सप्टेंबरदरम्यान रायगड ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गांचा सर्व्हे केला.

या दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम कोठेही सुरू नव्हते. महामार्गावर पडलेले खड्डे केवळ ४० टक्के बुजविल्याचे दिसले. खड्डे भरताना अपघात होणार नाहीत, याची दखल कुणीही घेतली नाही. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे बुजविले आहेत. पेव्हर ब्लॉकवरून गाडी जम्प होत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते, अशी वस्तुस्थिती मी न्यायालयासमोर मांडली. त्यानंतर न्यायालयाने या विषयाची गंभीर दखल घेऊन २६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. नॅशनल हायवे ऑथोरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दोषी असतील तर त्यांच्याविरोधात कडक कारवाईचे आश्‍वासन न्यायालयाने दिले आहे.

प्रतिनिधीही हजर नाही 
राजापूर येथे महामार्गावर झालेल्या अपघातात चार कुटुंबातील सात जणांचा बळी गेला. १० सप्टेंबरला न्यायालयात राष्ट्रीय महामार्गाची बाजू मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधीही हजर राहिला नाही, हे मी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायाधीश नरेश पाटील व राजेश केतकर यांनी ‘नॅशनल हायवे’चे कान उपटले, अशी माहिती ॲड. पेचकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com