काजूच्या जीआय मानांकनानंतरही प्रतीक्षा योग्य दराची

काजूच्या जीआय मानांकनानंतरही प्रतीक्षा योग्य दराची

आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे.

जिल्ह्यात काजू लागवडीखालील ६५ हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यातील उत्पादनक्षम ४५ हजार हेक्‍टर क्षेत्रातून सुमारे ५४ हजार टन काजू उत्पादित होतो. प्रतिकिलो ७० रुपये दरात घसरण झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ३७८ कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे काजूच्या दराबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर जिल्ह्याचे अर्थकारण बिघडणार असून, जिल्ह्यातील हजारो काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले जाणार आहे.

काजू लागवडीखालील क्षेत्र
काजूच्या दरात गेल्या काही वर्षांत झालेली वाढ व जिल्ह्यातील काजूला मिळत असलेली वाढती मागणी, यामुळे लागवड केलेल्या काजू बागायतदारांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे आंबा, भातशेतीने होरपळलेले बहुतांश शेतकरी काजू लागवडीकडे वळले. त्यातूनच जिल्ह्यात काजू लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होवू लागली. प्रतिवर्षी सुमारे पाच हजार हेक़्टर क्षेत्र काजू लागवडीखाली येत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. त्यातील सुमारे ४५ हजार हेक्‍टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे.

दर्जेदार काजूगर
जगातील काही देशांमध्ये काजूचे उत्पादन घेतले जाते; परंतु देशात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश, पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये काजूची लागवड आहे. समुद्र किनारपट्टयालगतच्या भागामध्ये उत्तम दर्जाचा काजू होतो. त्यामुळे राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तर कोल्हापुर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, राधानगरी तालुक्‍यातील काही भागांमध्ये चांगला काजू होतो. त्यातही सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील काजू चवीला उत्तम प्रतीचा आहे. या काजूला परदेशात मागणी आहे.

दरात मोठी घसरण
गेल्यावर्षी काजू हंगामाच्या सुरूवातीला १७५ ते १८० रुपये दर मिळाला. त्यामुळे साहजिकच काजू बागायतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. हंगाम संपताना देखील त्यामध्ये फार मोठी घसरण झाली नव्हती. त्यामुळे यावर्षी काजू सरासरी २०० रुपयांचा पल्ला गाठेल, असे स्वप्न बागायतदार बाळगून होते; परंतु प्रत्यक्षात काजूच्या दरात मोठी घसरण झाली. काजू हंगामाची सुरूवातच १०० रुपयांनी झाली आहे. त्यामुळे दरवाढीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या असलेल्या हजारो बागायतदारांचा हिरमोड झाला आहे.

बागायतदारांनी संघटित होण्याची गरज
गेल्या काही वर्षांत आंब्याप्रमाणे काजूनेही जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. काजूच्या उत्पादनक्षम ४५ हजार हेक्‍टर क्षेत्रातून ५४ हजार टन काजू उत्पादन होते. सरासरी प्रतिकिलो ७० रुपयाचे नुकसान झाले तर काजू बागायतदारांचे अंदाजे ३७८ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. दराची ही घसरण कायम राहिली तर ती जिल्ह्याच्या अर्थकारणाच्या मूळावर येणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी काजूचा प्रमुख पीक म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळे दर घसरणीच्या संकटाला काजू बागायतदारांनी संघटितपणे तोंड देण्याची गरज आहे.

दर्जानुसार मिळावा दर 
व्हीएतनाम, घाणा, बेनी, ट्रांन्झानिया, मोझांबिंका यांसह विविध देशात मोठ्या प्रमाणात काजू पडून आहे. आकाराने हा काजू मोठा दिसत असला तरी त्याची तुलना जिल्ह्यातील काजूगरांची कधीच होवू शकत नाही. एका विशिष्ट चवीमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील काजूला जीआय मानांकन मिळाले आहे. त्यामुळे दर्जानुसार काजुला दर मिळणे आवश्‍यक आहे. तशाप्रकारचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.

..तर काजू बदनाम होणार 
परदेशातील काजू स्वस्त मिळत असल्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील कारखानदार हा काजू खरेदी करीत आहेत. या काजूवर प्रक्रिया केल्यानंतर तो पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठविला जाईल. जिल्ह्यातील काजू म्हणून बेचव काजू विविध बाजारपेठांमध्ये गेल्यास आतापर्यंत चवदार ओळखल्या जाणाऱ्या आपला काजू बदनाम होणार आहे. या सर्व प्रकारात हा मोठा धोका प्रामुख्याने दिसत असून त्याचे दुरगामी परिणाम व्यवसायावर होण्याची शक्‍यता आहे.

काजूचा ब्राझील ते भारत प्रवास
काजू हे पीक पूर्वी बाझ्रीलमध्येच घेतले जायचे. पोर्तुगीजांनी आपल्यासोबत हे बी आपल्याकडे आणले. विशेषतः जमिनीची धुप थांबविण्यासाठी या झाडाचा वापर केला जावू लागला. कालांतराने विविध प्रादेशिक संशोधन केंद्रांनी काजूच्या विविध जातीचा शोध लावला. त्यानंतर पुन्हा येथील अधिक उत्पादन देणाऱ्या काजूच्या जाती पुन्हा आफ्रिकन देशात लागवडीकरीता नेण्यात आल्या आहेत.

गुणवैशिष्ट्ये समोर आणणे आवश्‍यक
बदामला सरासरी दर हा सातशे ते आठशे रूपये मिळतो; परंतु कॅलिफोर्नियांतील बदामांमध्ये वेगळी गुणवैशिष्टे असल्यामुळे त्या बदामाला दोन हजार पाचशे ते तीन हजार इतका दर मिळतो. याच पद्धतीचा अवलंब जिल्ह्यातील काजूकरीता करणे आवश्‍यक आहे. कोकणातील काजू तसेच इतर काजूची तुलना होत नाही, हे सिध्द करून त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

काजू हे पीक उष्ण दमट हवामानात घेतले जाते. आफ्रिकन देशातील वातावरण काजूला पोषक आहे. त्यामुळे काही देशांमध्ये सप्टेंबर तर काही देशांमध्ये मार्चमध्ये उत्पादन येते. या देशांमध्ये चांगले उत्पादन आल्यामुळे मोठ्या प्रमाणात काजू पडून आहे. हा काजू आपल्या देशांमध्ये पाठविला जात आहे; परंतु यामध्ये देखील व्यापाऱ्यांची फसवणूक होत असते. पसंत केलेला काजू व प्रत्यक्षात पाठविलेल्या काजू हा वेगळा असतो. याशिवाय काजू खराब होण्याचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक असते. जे आपल्याकडील काजूच्या बाबतीत एक टक्का आहे. याशिवाय त्या काजूपासून गर मिळण्याचे प्रमाणही कमी आहे.
- प्रा. विवेक कदम,
काजू अभ्यासक

अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरण व त्यानंतर झालेले वादळी वारे, यामुळे काजूला मोहोरच कमी आला. त्यामुळे यावर्षी उत्पादन कमी मिळणार आहे. तर दुसरीकडे आयातशुल्क कमी केल्याने परदेशातील काजूची आवक झाली. परिणामी काजूचा दरही कमी झाला. या सर्व प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. काजू बागायतदारांना यातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत व कमीत कमी १६० रुपये हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करावेत.’’
- विलास देसाई,
काजू बागायतदार, एडगाव

परदेशातून आलेल्या स्वस्त काजूमुळे गेल्यावर्षी व यंदाच्या दरात सुमारे ६० रुपयांचा फरक पडला आहे. त्यामुळे कारखानदारांचा कल तो काजू खरेदीकडे आहे. त्याचा सर्वाधिक फटका येथील काजू बागायतदारांना बसणार आहे. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढायचे असेल तर जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूचे वेगळ्या पद्धतीने ब्रँडिंग करणे आवश्‍यक आहे.
- रवींद्र मांजरेकर,
काजू प्रक्रिया उद्योजक, नाधवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com