रत्नागिरी विमान वाहतुकीत व्यस्त वेळापत्रकाचा अडथळा 

रत्नागिरी विमान वाहतुकीत व्यस्त वेळापत्रकाचा अडथळा 

रत्नागिरी - तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेले मिरजोळे येथील विमानतळ नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येथून खासगी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र मुंबई ते गोवा मार्गावरील विमानांचे व्यस्त वेळापत्रकाचा अडथळा निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढेपर्यंत रत्नागिरीकरांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. 

रत्नागिरी आणि मुंबई हा हवाई प्रवास काही वर्षांपूर्वी सुरू होता. खासगी विमान कंपन्यांच्या पुढाकारामुळे ते शक्‍य होत होते. एमआयडीसीच्या ताब्यातील रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाने ताब्यात घेतले. सुरक्षेच्या दृष्टीने कोकणात मोठा तळ येथे उभारला जात आहे. त्यासाठी आवश्‍यक धावपट्टीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च विस्तारीकरणासाठी केला आहे. रत्नागिरी विमानतळाच्या विस्ताराचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन किलोमीटरची धावपट्टी, टर्मिनस बिल्डिंग आदी कामेही मार्गी लागली आहेत.

विमान लॅडिंग आणि टेकऑपची प्राथमिक चाचणीही घेण्यात आली; मात्र या विमानतळावरून खासगी विमान सेवा सुरू करण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांनी विशेष प्रयत्न चालविले होते. त्यासाठी चार खासगी कंपन्यांशीही चर्चा झाली. 

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील विमान चालविण्याचे वेळापत्रक व्यस्त आहे. मुंबई ते रत्नागिरी विमान चालविताना त्यातील एक विमान रद्द करून सेवा सुरू करावी लागणार आहे. खासगी कंपन्यांनी सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात विमान चालविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दुपारच्यावेळी त्याला तितकासा प्रतिसाद मिळणार नाही.

रत्नागिरीचा उडान योजनेत समावेश केला असला, तरीही त्याचा लाभ घेण्यातही तांत्रिक अडचणी आहेत. त्यावर मुंबई ते गोवा विमानाला रत्नागिरीत थांबा देण्याचा पर्याय ठेवण्यात आला होता. पण मूळ प्रवास तीन तासावर गेला, तर तो प्रवाशांना शक्‍य होणार नाही. खासगी हेलिकॉप्टर सेवाही सुरू करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेले प्रकल्प यांसह मुंबईशी असलेले नाते हे लक्षात घेता अनेक प्रवासी खासगी विमान सेवेची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांना विमानाचा प्रवाशासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

""रत्नागिरीतून विमान सेवा सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. यामधील त्रुटी दूर करून लवकरात लवकर सेवा सुरू करण्यासाठी पर्याय निवडले जात आहेत.'' 
- उदय सामंत,
आमदार, म्हाडा अध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com