साखरपा-जोशीवाडी धरण राम भरोसे 

संदेश सप्रे
सोमवार, 8 जुलै 2019

देवरूख - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरणफुटी प्रकारानंतर अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प चर्चेत आले आहेत. 30 वर्षांपूर्वी साखरपा जोशीवाडी येथे उभारण्यात आलेले धरणही धोकादायक स्थितीत उभे आहे. हे धरण धोकादायक असल्याने काही महिन्यांपूर्वी यातील पाणीसाठा रिकामा करण्यात आला होता. धरणाची पाहणी करता त्याची डागडुजी तातडीने करणे गरजेचे बनले आहे. 

देवरूख - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरणफुटी प्रकारानंतर अनेक लघु पाटबंधारे प्रकल्प चर्चेत आले आहेत. 30 वर्षांपूर्वी साखरपा जोशीवाडी येथे उभारण्यात आलेले धरणही धोकादायक स्थितीत उभे आहे. हे धरण धोकादायक असल्याने काही महिन्यांपूर्वी यातील पाणीसाठा रिकामा करण्यात आला होता. धरणाची पाहणी करता त्याची डागडुजी तातडीने करणे गरजेचे बनले आहे. 

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ओरोस, सिंधुदुर्गनगरी, लघु पाटबंधारे विभाग ओरोस यांच्यातर्फे साखरपा लघु पाटबंधारे योजनेतंर्गत कोंडगाव आणि साखरप्याच्या सीमेवर साखरपा जोशीवाडी नाल्यावर हे धरण बांधले.

धरणाचे पाणलोट क्षेत्र 2.978 चौ. कि.मी., धरणाची लांबी 346 मीटर, पूर्ण जलसंचय पातळी 132 मीटर, बर पद्धतीचा सांडवा 33 मीटर, डावा कालवा 3 कि.मी., 260 हेक्‍टर क्षेत्र सिंचनासाठी धरणाची उंची 32.50 मीटर, सिंचनासाठी पाणी वापर 3.019 द.ल.घ.मी., पिण्यासाठी पाणीवापर 0.348 द.ल.घ.मी., एकूण पाणीसाठा 3.692 द.ल.घ.मी. असे असून यासाठी त्यावेळी 1279.47 लाख रुपये खर्च केले. पाच वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती. त्यावेळी याची डागडुजी केली होती. त्यानंतर आजपर्यंत या धरणाकडे कोणत्याही विभागाचा अधिकारी फिरकलेला नाही. 

गळतीच्या ठिकाणी केल्या केवळ खुणा 
ऑक्‍टोबर 2017 साली निवृत्त शिक्षक दत्ताराम शिंदे यांनी धरणाला गळती लागल्याचे दाखवून दिले होते. त्यावेळी अधिकाऱ्यांनी धावाधाव केली. मात्र केवळ भिंतीवर खुणा करण्यापलीकडे काहीच केले नाही. धरणासमोर 500 पेक्षा अधिक लोकवस्ती आहे. येथील लोकांना केवळ पोलिसपाटील आणि सरपंचांमार्फत सतर्कतेच्या सूचना देण्यात येतात. 

""धरण धोकादायक आहे म्हणूनच यात पाणीसाठा करण्यात आलेला नाही. भिंतीवर चार ठिकाणी पांढऱ्या खुणा करण्यात आल्या आहेत. त्या गळतीच्या जागा असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या धोकादायक धरणाबाबतीत शासनाने योग्यवेळी विचार करावा.'' 
- मारुती शिंदे,
कोकण संघटक, पोलिसपाटील संघटना. 
 
""धरणाची अवस्था बिकट आहे. भिंतीवर झुडपे वाढली आहेत. धरणाला गळती असल्याने मे महिन्यात पाणी सोडून देण्यात आले. आगामी काळात पाणीसाठा झाल्यास ते धोकादायक ठरेल त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.'' 
- विजय पाटोळे,
सरपंच, साखरपा  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue of Sakharpa Joshiwadi dam special report