मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेसाठी आमदार दीपक केसरकर म्हणाले`यांच्याशी` बोलू

Issue Of Space of Multispeciality Hospital MLA Deepak Kesarkar Comment
Issue Of Space of Multispeciality Hospital MLA Deepak Kesarkar Comment

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरासाठी मंजूर करण्यात आलेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल हे शहरातच होणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आपण मतदारसंघात येणार असून, जागेचा असलेला तिढा आपण राजघराण्याशी बोलून सोडवणार आहे. या हॉस्पिटलवरून उगाच आपापसांत राजकारण नको, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली 

येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात भूमिपूजन झालेले मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल याठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने शहराबाहेर वेत्ये येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत उभारण्यात येणार आहे. या जागेची पाहणी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

ही जागा अंतिम करत पुढील सोपस्कार पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत; मात्र शहरातील मंजूर हॉस्पिटल शहराबाहेर नेण्यावरून नगराध्यक्ष संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, व्यापारी संघटना, उद्योजक, व्यावसायिक यांनी जोरदार विरोध दर्शवला. प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही दिला. एकूणच हॉस्पिटलच्या विषयावरून आता आरोप - प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. 

आमदार केसरकर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्रिपद दिले होते. या मंत्रिपदाच्या माध्यमातून केसरकर यांनी जिल्ह्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. त्यापैकी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल असून, 20 कोटी रुपयांची तरतूद या हॉस्पिटलसाठी केली आहे.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात हे हॉस्पिटल हवे म्हणून केसरकर यांनी पुढाकार घेत ही जागा न्यायप्रविष्ठ असतानाही राजघराण्याची चर्चा करून त्या जागेत भूमिपूजन केले होते; मात्र न्यायप्रविष्ठ जमिनीबाबत योग्य निर्णय होत नसल्याने मंजूर असलेल्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे बांधकाम रखडले गेले. परिणामी, खासदार विनायक राऊत यांनी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेत या हॉस्पिटलसाठी शहरातच अन्य एक शासकीय जागा पाहिली होती; मात्र हॉस्पिटलसाठी आवश्‍यक पाच एकर जमीन त्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने शहरालगत असलेल्या वेत्ये येथील ग्रामपंचायतीच्या मालकीची सहा एकर जागा खासदार राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहिली.

जागा ग्रामपंचायत बक्षीसपत्राने देण्यास तयार आहे. त्यामुळे ही जागा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अंतिम करण्यात आली. शहरात पालिकेने आरक्षित ठेवलेली जागा व भूमिपूजन झालेल्या जागेसाठी पैसे मोजावे लागणार असल्याने हॉस्पिटलसाठी निधी शिल्लक राहणार का, असे उदय सामंत यांनी म्हटले होते. एकूणच हॉस्पिटलच्या जागेवरून वाद पेटण्याची संभावना निर्माण झाली असता याबाबत दीपक केसरकर यांची भूमिका जाणून घेण्यात आली. 

सावंतवाडीत सर्वांना सोयीचे होईल अशी जागा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी निवडली होती. त्यामुळे निवडण्यात आलेल्या जागेतच हॉस्पिटल होणार असून, आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे. येत्या पंधरा दिवसांत आपण मतदारसंघामध्ये येणार असून, आवश्‍यक ती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. उगाच हॉस्पिटलवरून आपापसांत राजकारण योग्य नाही. 
- दीपक केसरकर, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com