‘आयटी स्टार्ट अप’ संस्कृतीच्या दिशेने 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

साखर कारखाने, सहकारी बॅंका, गूळ उत्पादन, काकवी, कोल्हापुरी चप्पल, कुस्ती, तांबडा-पांढरा रस्सा व कोल्हापुरी मिसळसाठी प्रसिद्ध कोल्हापूर शहराची नवी ओळख, माहिती व तंत्रज्ञानासाठी करून देण्याचा प्रयत्न केली अनेक वर्षे विविध माध्यमांतून सुरू आहे. तंत्रज्ञान विकासात आघाडीवर असणारा पुणे-बंगळूर कॉरिडॉर जवळ असल्याने तसा प्रयत्न योग्य व स्तुत्य आहे. कोल्हापूरची वाटचाल ‘आयटी स्टार्ट अप’ संस्कृतीच्या दिशेने सुरू झाली आहे.
- डॉ. आर. के. कामत, इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ

२००५-०६ मध्ये कोल्हापूरमधील सर्व घटकांनी एकत्र येऊन पुणे-बंगळूरमधील नॅसकॉमसारख्या दिग्गज संस्थांचा आधार घेऊन आयटी विकासाचा श्रीगणेशा केला. कोल्हापूर आयटी असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ व स्थानिक जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे आयटी विकासाची मशाल सतत तेवत ठेवली. याचाच परिपाक म्हणून आयटी उद्योजकता विकासासाठी प्रशासनाकडून साधारणत: पाच एकर जागेच्या हस्तांतराचीही घोषणा नजीकच्या काळात झाली आहे. त्यामुळे सहा हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची सोय होण्याची शक्‍यता आहे. आयटी क्षेत्र येथील आयटी पार्कच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयांकडे दोन वर्षांच्या काळात झेपावणार आहे. नियमित विमानसेवा सुरू झाल्यास कोल्हापूरच्या अंगभूत नैसर्गिक क्षमतेमुळे आयटी व्यवसाय नक्कीच वाढणार आहे. त्यासाठी केंद्र शासन व देशात नव्यानेच विकसित झालेल्या साहस निधीचा फायदा घेऊन युवावर्गास त्या दृष्टीने प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.

‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्ट अप इंडिया’ व ‘स्टॅंड अप इंडिया’च्या माध्यमातून ‘स्टार्ट अप संस्कृती’चा उदय झाला आहे. देशातील विविध शहरांत साधारण ४२०० स्टार्ट अप कार्यरत असून त्यातील आठ उद्योग एक अब्ज रुपयांपुढे उलाढाल करताना दिसत आहेत. भारताची क्रमवारी अमेरिका व युरोपच्या पाठोपाठ आहे. सद्यःस्थितीत दरदिवशी भारतात तीन ते चार स्टार्टअपची भर पडल्याचे दिसते. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येकासाठी ब्रॉडबॅंड योजनेअंतर्गत चारशे दशलक्ष लोकांना २०२२ पर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. अटल इनोव्हेशन मिशनमधून देशातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, संशोधक व उद्योजकांना एकत्र आणून आर्थिक विकास व नोकऱ्यांच्या निर्मिती व्यवस्थेस सुरवात झाली आहे.

नवनव्या कल्पना व त्याचे उद्योगांमध्ये रूपांतर हे आर्थिक मदतीशिवाय शक्‍य नसते. स्टार्ट अप व्यवस्थेसाठी १.५ अब्ज इतक्‍या साहस निधीची पुढील चार वर्षांसाठी तरतूद केल्याने अनेक युवा उद्योजकांची निर्मितीच देशात होणार आहे. जलद पेटंट ८० टक्के सवलतीच्या दरात दाखल करण्याच्या सुविधेमुळे स्टार्ट अप व्यवस्था आणखी सक्षम होत आहे. या युवा उद्योगांसाठी निधी पुरवणाऱ्या संस्थांना तसेच या उद्योगांनासुद्धा दिलेल्या करसवलतीमुळे स्टार्ट अप संस्कृती देशातील अनेक शहरांत विकसित होत आहे. युवा उद्योजकांना देऊ केलेल्या प्रोत्साहनामुळे २०२० पर्यंत लाखो नोकऱ्यांची निर्मिती शक्‍य झाली आहे. 

सरकारच्या बरोबरीनेच काही इतर प्रमुख संस्थांनीही ‘स्टार्ट अप विकासा’साठी कंबर कसली आहे. यात प्रामुख्याने सिडबी अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत १०० कोटी रुपये स्टार्ट अपसाठी देऊ केलेले आहेत. नॅसकॉमच्या १० हजार स्टार्ट अप योजनेअंतर्गत नवीन कल्पनांना उद्योगांमध्ये रूपांतर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. नॅशनल इन्व्हेस्टमेंट प्रमोशन व कॅसिलिटेशन संस्थेने संभाव्य उद्योजकांसाठी चार आठवड्यांच्या विशेष ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचीसुद्धा व्यवस्था आहे. 

सद्यःस्थितीत मोठमोठ्या टिअर-१ शहरांतून स्टार्ट अपचा प्रसार हा छोटी शहरे व ग्रामीण भागाकडे म्हणजेच टिअर-२ व टिअर-३ शहरांकडे होताना दिसत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाची इतर क्षेत्रांशी उदा. शेती, आरोग्य, उत्पादन इत्यादींशी सांगड घालून नवीन उद्योग निर्माण होत आहेत. भारतातील २०१६ मध्ये परदेशी शिक्षणासाठी गेलेल्या तीन लाख साठ हजार विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतल्यास येथील विद्यार्थी ब्रेन ग्रेनच्या माध्यमातून परत स्टार्ट अप संस्कृतीत वाढ करण्याची शक्‍यता आहे. केरळसारख्या राज्याने तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारे एक नवीन आदर्श घालून दिलेला आहे. कोचीमध्ये २०१२ मध्ये स्टार्टअप व्हिलेजची निर्मिती केली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूरमध्ये गरज आहे ती स्टार्ट अपकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची. स्टार्ट अपचा प्रचार आणि प्रसार करून नक्कीच आपण कोल्हापूरच्या युवावर्गामधील क्षमतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

तज्ज्ञ म्हणतात
आयटीला आवश्‍यक गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ कोल्हापुरात उपलब्ध आहे; मात्र प्रॉमिसिंग करिअरसाठी ते पुणे-मुंबईकडे धाव घेते. आयटीकडे गरज म्हणून पाहायला हवे. मार्केट खूप बदलले आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांनी कोल्हापुरातच स्वत:ची कार्यालये उघडायला हवीत. जेणेकरून येथेच करिअर घडवता येईल.
- विनय गुप्ते 

कोल्हापूर आयटीमध्ये परदेशात सेवा पुरविणारा व नॉव्हेल संकल्पना येथेच राबविणारा असे दोन वर्ग आहेत. शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण सहसंचालकाची पहिली वेबसाइट येथेच तयार झाली. येथील नॉव्हेल संकल्पनांचे राज्यात अनुकरण होते; मात्र मोठ्या शहरांसोबत ‘कनेक्‍टिव्हिटी’साठी विमानसेवा व जलद रेल्वेसेवा उपलब्ध होणे आवश्‍यक.
- विश्‍वजित देसाई 

आयटीसंदर्भात जनजागृती करणे, हा उत्तम पर्याय आहे. या क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण स्थानिक लोकांसह राज्य व राष्ट्रीयस्तरावरील तज्ज्ञांचा सल्ला घेऊन एक मॉडेल तयार करावे लागेल. ज्यामुळे या क्षेत्राला ऊर्जितावस्था येईल. आर्थिक तरतुदीपेक्षा तूर्त या घटकाला प्राधान्य दिले तर पुणे, मुंबईतील कामे कोल्हापूरकडे नक्कीच येतील. त्यांचा ओघ वाढत राहील.
- शांताराम सुर्वे

सॉफ्टवेअर व हार्डवेअरपैकी शासकीय कामे स्थानिक हार्डवेअर कंपन्यांना मिळावीत. या कंपन्यांची उलाढाल तीन ते चार कोटी असते. मात्र, शासन कामांचे टेंडर काढताना पंधरा कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य देते. सॉफ्टवेअर व्हेंडरनाही सब कॉन्ट्रॅक्‍टिंगच्या रूपाने कामे मिळायला हवीत. ट्रेनिंग इन्स्टिट्युशन्सनाही बुस्ट करावे.
- अभिजित हावळ

टेक्‍नॉलॉजी ही दुधारी तलवार आहे. त्यातून जेवढे म्हणता येईल तेवढे फायदे आहेत, मात्र तोटेही खूप आहेत. सायबर गुन्ह्यासाठी त्याचा अधिक वापर होतो, मात्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सांगलीत त्याचे प्रमाण कमी आहे. ते वाढू नये, यासाठी समाजाला तंत्रज्ञान शिकवणे गरजेचे आहे. शिवाय पोलिस यंत्रणेनेही यातील बारकावे समजून घ्यावे.
विनायक राज्याध्यक्ष, सायबर फॉरेन्सिक अँड आयटी सिक्युरिटी एक्सपर्ट, सांगली

कोल्हापूर आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ टेक्‍निकली खूप सक्षम आहे. त्यांना त्यांच्या सक्षमतेनुसार काम मिळावे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन कंपन्यांची संख्या वाढावी. मुंबई, पुण्यातील कंपन्या युकेमधील छोटे छोटे प्रकल्प घेऊन काम करतात. तशी संधी येथील कंपन्यांनाही मिळविता येईल. त्यातून आयटीत करिअर करू इच्छिणाऱ्यांना रोजगार मिळेल.
- नीलेश पाटील 

डिजिटल इंडियांतर्गत येणाऱ्या काही वर्षांत ई-कॉमर्स क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी वेब आणि मोबाइल ॲप्लिकेशन्स्‌ची यंत्रणा सक्षम करावी लागेल. यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सुविधांची ‘बॅंड विड्‌थ’ नव्याने उभारावी लागलेत. त्यात वायरड्‌ आणि वायरलेस असे दोन स्तर उभारावे लागलीत. ही यंत्रणा ग्रामीण भागातही पोचवावी.
-अशोक सावंत, लोटस्‌ कॉम्प्युटर, सांगली 

माहिती तंत्रज्ञान हे आताच्या तरुणाईचं जगण्याचं साधन बनलय. मूळात या क्षेत्रातील वेगामुळे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्यात. त्यावर आपलं शहर स्वार व्हायचं असेल, तर त्या पद्धतीच्या सुविधा देणं गरजेचे आहे. ‘मेक इन इंडियां’तर्गत जिल्हा स्तरावर आयटी पार्क उभारले, तर स्थानिक तरुण परराज्यात जाणार नाहीत.
-आनंद क्षीरसागर, आयटी क्षेत्रातील नोकरदार

कोकणचा विचार करता येथे माहिती तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा होताना दिसत नाही. या क्षेत्रातील सोयी-सुविधा येथे उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. येथील विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञानाबाबत मानसिकताही बदलणे आवश्‍यक आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर येथील विकासासाठीही प्रभावीपणे करता येऊ शकेल. त्यासाठी आवश्‍यक तरतूद करावी
- संजीव देसाई, संचालक-भोसले नॉलेज सिटी

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील महाविद्यालयांतील आयटी अभ्यासक्रमामुळे कॉम्प्युटर अवेअरनेस वाढला आहे. केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या डिजिटलायझेशनला कोकणातही चांगली सुरवात झाली आहे. कॉम्प्युटर हार्डवेअरप्रमाणे सॉफ्टवेअर क्षेत्रातही युवकांना चांगला रोजगार मिळेल. आयटी पार्क, कॉल सेंटर उभारल्यास कोकणात रोजगार उपलब्ध होतील.
-योगेश मुळ्ये, कॉम्प्युटर व्यावसायिक, रत्नागिरी

Web Title: IT start-up culture in the direction