जगबुडी नदी धोक्‍याच्या पातळीवर; मुंबई गोवा महामार्ग ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

खेड - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्‍यात पुन्हा पावसाने धुडगूस घालायला सुरवात केल्याने आज जगबुडी नदी धोक्‍याची पातळी ओलांडून वाहू लागली. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री आठ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

खेड - दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर खेड तालुक्‍यात पुन्हा पावसाने धुडगूस घालायला सुरवात केल्याने आज जगबुडी नदी धोक्‍याची पातळी ओलांडून वाहू लागली. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री आठ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जगबुडीसह नारिंगी नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांसह शहरातील व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

गेल्या आठवड्यात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात धुवांधार पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. खेडची जगबुडी व चिपळूणची वाशिष्ठी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद केले होते. त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. 

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून खेड तालुक्‍यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने तालुक्‍यातील नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली. जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने सायंकाळच्या वेळेला जगबुडी नदीच्या पातळीने धोक्‍याची पातळी ओलांडली. जगबुडीचे पाणी जुन्या पुलाला पोहचण्याची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी खेडचे तहसीलदार शिवाजी जाधव यांना दिली. जाधव यांनी तत्काळ जगबुडी पुलावर धाव घेतली.

दरम्यान, खेड पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत ग्रुपच्या सदस्यांच्या मदतीने रात्री आठ वाजता जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद केला. पूल बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. जगबुडी पुलावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagbudi cross danger level Mumbai Goa highway block