अटकपूर्व जामीन फेटाळला, तुरुंग अधीक्षक अडचणीत, काय आहे प्रकरण?

भूषण आरोसकर | Friday, 31 July 2020

झिलबाने पाटील यांना कळवल्यानंतर राजेशला रुग्णालयात हलवले; परंतु डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. राजेशच्या मृत्यूनंतरच्या पंचनाम्यात त्याच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा नमूद नाहीत.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील कारागृहात कैदी राजेश गावकर यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची टांगती तलवार असलेले तुरुंग अधीक्षक योगेश पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

गेल्या वर्षी 19 डिसेंबरला राजेश गावकरला तुरुंग अधीक्षक पाटील व सुभेदार झिलबा पांढरमिसे या दोघांनी तुरुंगाच्या लाल गेटजवळ लाथाबुक्‍क्‍यांनी आणि लाठ्यांनी मारहाण केली होती. तो आजारी असूनही त्याला दोघांनी प्रचंड मारहाण केली. येथील पोलिस ठाण्यातील तपास अधिकाऱ्यांनी सरकारी वकील एस. व्ही. गावंड यांच्यामार्फत न्यायधिश अजय गडकरी यांच्यासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत कैदी राजेशला बरे वाटत नसल्याचे एका कैद्याने कळवल्यानंतर सुभेदार झिलबा त्यांच्या कोठडीत गेला.

त्यानंतर झिलबाने पाटील यांना कळवल्यानंतर राजेशला रुग्णालयात हलवले; परंतु डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले. राजेशच्या मृत्यूनंतरच्या पंचनाम्यात त्याच्या शरीरावर गंभीर जखमांच्या खुणा नमूद नाहीत. त्याच्यासोबतच्या कैद्यांनीही अधीक्षकांविरोधात जबाबात कोणताही आरोप केला नव्हता, असा युक्तिवाद अर्जदारांतर्फे ऍड. एन. एन. गवाणकर यांनी मांडला; मात्र राजेशच्या शरीरावर जखमांच्या 17 खुणा आणि त्यातील सहा जखमा या त्यांच्या डोक्‍यावर असल्याचे विच्छेदन अहवालात नमूद आहे.

शिवाय राजेशच्या डोक्‍यावरील जखमा आणि अंतर्गत जखमा तो पडल्यामुळे होण्याची शक्‍यता कमी असून एखाद्या कडक वस्तूने जोरात मारल्याने त्या झाल्या आहेत, असा अहवाल राजे छत्रपती शाहू महाराज सरकारी मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुखांनी 24 जानेवारी 2020 ला दिला, असे गावंड यांनी निदर्शनास आणले. त्याची गंभीर दखल न्यायमूर्तींनी घेतली. विच्छेदन अहवाल आणि सह कैद्यांचे नंतरचे जबाब लक्षात घेता आरोपींविरोधात गंभीर आरोप आहेत आणि त्यांची कोठडीतील चौकशी केल्याविना सत्य बाहेर येऊ शकणार नाही. त्यामुळे ते अटकेपासून संरक्षणासाठी पात्र ठरत नाहीत, असे निरीक्षण नोंदवून न्यायधिश गडकरी यांनी त्यांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे या प्रकरणात तुरुंगाधिकारी योगेश पाटील यांना अटक होण्याची शक्‍यता आहे.  

संपादन - राहुल पाटील