मालवणात जेलीफिशचे आक्रमण रापणीपर्यंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मार्च 2019

मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या जेलीफिशच्या आक्रमणामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे गेले महिनाभर मासळीची आवकच कमी झाली असून अल्प प्रमाणात मिळणाऱ्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.

मालवण - जिल्ह्याच्या सागरी हद्दीत सध्या जेलीफिशच्या आक्रमणामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत. सोसाट्याचा वाऱ्यामुळे गेले महिनाभर मासळीची आवकच कमी झाली असून अल्प प्रमाणात मिळणाऱ्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पारंपरिक रापण पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीऐवजी जेलीफिश मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने मत्स्यदुष्काळाचे मोठे संकट मच्छीमारांवर ओढवले आहे. आज येथे रापणीत लाखोंच्या संख्येने जेलिफीश सापडल्याने मच्छीमारांची अस्वस्थता आणखी वाढली.

यावर्षी मत्स्य हंगामाची सुरवात चांगली झाली. पहिल्या टप्प्यात किंमती मासळीची चांगली कॅच मिळाली. त्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण होते; मात्र ऑक्‍टोबरपासून जेलीफिशचे अतिक्रमण वाढल्याचे दिसून आले. गेले काही महिने येथील समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या मच्छीमारांच्या जाळ्यात मासळी ऐवजी जेलीफिश मासळीच जास्त येत असल्याने मच्छीमार हैराण बनले आहेत.

जेलीफिशला हात लावल्यास त्या भागास असह्य वेदना होतात व खाज सुटते. शरीराची अक्षरशः आग होते. यात केव्हा केव्हा मनुष्याला आपला जीवसुद्धा गमवावा लागतो. सध्या मच्छीमारांच्या सर्वच जाळ्या जेलीफिशच्या झुंडीनी भरून जात आहेत. त्यामुळे जेलिफिशची वाढती संख्या सध्या मच्छीमारांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

जेलिफिश माशांची पिल्ले खातात आणि समुद्री प्लवंगावरही जगतात. तज्ज्ञांचे मते जेलिफिशचे भक्षक असलेले समुद्री कासव व इतर मोठे मासे यांची संख्या कमी झाल्याने जेलिफिशची संख्या वाढत आहे. सागरी परिसंस्थेत मनुष्यप्राणी करत असलेल्या अति हस्तक्षेपाचा हा परिणाम आहे. त्यामुळे बिघडलेल्या समुद्री पर्यावरणीय साखळीच्या प्रश्‍नाकडे सरकार व मच्छीमारांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. याचबरोबर अतिरेकी मासेमारीला लगाम घालायला हवा. 

उपद्रवी जेलिफिशने सध्या मच्छीमारांना हैराण करून सोडले आहे. लाखोंच्या संख्येने जेलिफिशच्या झुंडीच्या झुंडी समुद्रात संचार करत आहेत. जेलिफिशच्या स्पर्शामुळे होणाऱ्या असह्य वेदना व जाळ्यांची हानी टाळण्यासाठी मच्छीमार मासेमारी न करताच सध्या माघारी परतत असल्याचे चित्र आहे. जेलिफिशला स्थानिक भाषेत झार आणि बेलका असे म्हटले जाते. गर्द पिवळसर तसेच चंदेरी रंगामधील छत्रीच्या आकाराचा हा मासा अतिशय बुळबुळीत असतो. लाखोंच्या संख्येने हे मासे सध्या गिलनेटधारक व रापण व्यावसायिक मच्छीमारांच्या कार्यक्षेत्रात विशेषकरून पंधरा वावाच्या आत आढळून येत आहेत. 

गेले दोन महिने सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मच्छीमारांना मासेमारीस जाताना अनेक समस्या भेडसावत होत्या. यात आता जेलिफिशचे अतिक्रमण वाढल्याने किंमती मासळीच मिळणे कठीण बनले आहे. जी काही ठराविक मासळी मच्छीमारांना मिळत आहे त्याचे दर गगनाला भिडले आहेत. किनारपट्टी भागातील दांडी येथील मेस्त रापण संघाच्या रापणीच्या जाळीत आज मोठ्या प्रमाणात जेलिफिशची मासळी सापडली. जेलिफिशची वाढती संख्या म्हणजे मत्स्यदुष्काळाचे सावट असे समजले जात असल्याने या मोठ्या मत्स्यदुष्काळाचे संकट मच्छीमारांसमोर आवासून उभे राहिले आहे. 

जेलीफिशचा उपद्रव
जेलीफिश हा पाठीचा कणा नसलेला जलचर आहे. तो अत्यंत पारदर्शक आणि जेली सारखा असतो. त्यामुळेच त्याला जेलिफिश हे नाव पडले आहे. जेलीफिश हा स्वतःहून दंश करत नाही. त्याच्या मार्गात आल्यावरच तो दंश करतो. जेलीफिश हा आपल्या अंगावरील काट्यानी शत्रूवर हल्ला करतो. हे काटे विषारी असल्याने माणसाच्या त्वचेवर काटे टोचल्याने लालसर फोड येऊन खाज येणारा पुरळ शरीरावर उठतो. हा त्रास काही आठवडे किंवा काही महिने सहन करावा लागतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jailfish attack in Malvan