सेना-भाजप संघर्षात जैतापूरचे इंधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

राजापूर - माडबन येथील नियोजित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाशी नुकतीच चर्चा केली. या चर्चेअंती प्रकल्पाचे काम पुढील वर्षअखेरीस पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहेत. अशा स्थितीमध्ये केंद्रासह राज्यामध्ये सत्तेमध्ये एकत्र राहून अंतर्गंत धुसफूस असलेल्या सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये प्रकल्पाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आमने-सामने येऊन धुमश्‍चक्री उडण्याची शक्‍यता आहे. 

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये केंद्र शासनातर्फे दहा हजार मेगावॉट क्षमतेचा जैतापूर प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नशील असून प्रकल्पस्थळी काही कामेही करण्यात आली आहेत. या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे राजापूर नव्हे, तर कोकण परिसर उद्‌ध्वस्त होण्याची भीती प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. त्यातूनच, गेल्या काही वर्षांपासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून प्रकल्पाच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने छेडण्यात आली. काहीवेळा या आंदोलनाला उग्र स्वरूप आले होते. त्यातून आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये नाटे येथील तबरेज साहेकर या युवकाचा मृत्यू झाला होता. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला. कोणत्याही स्थितीमध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही, असे शिवसेना नेतृत्वाने वेळोवेळी स्पष्ट करून प्रकल्पाचा मुद्दा प्रतिष्ठेचा व निवडणुकीचा केला. मात्र, केंद्रासह राज्यामध्ये भाजपसोबत सत्ताधारी असूनही शिवसेनाला जैतापूर प्रकल्प रद्द करणे शक्‍य झालेले नाही. त्यातच, प्रकल्पाच्या उभारणीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनही पाऊल पुढे टाकत आहे. 

शिवसेनेचा विरोध असतानाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी फ्रान्सच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावेळी पुढील वर्षी प्रकल्पाच्या कामाला सुरवात होईल, 2025 मध्ये पहिला रिऍक्‍टर सुरू होईल, असे संकेत मिळाले. 2027 पर्यंत सर्वच्या सर्व रिऍक्‍टरमधून ऊर्जानिर्मिती होण्याचेही संकेत मिळाले. त्यामुळे सारे विरोध डावलून प्रकल्प होणार हे आता स्पष्ट झाले. त्यामुळे आता सेना-भाजप या मुद्द्यावरून आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. 

जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीला प्रकल्पग्रस्तांचा नेहमीच विरोध आहे. भविष्यातही राहणार आहे. कोणत्याही स्थितीमध्ये जैतापूर येथे प्रकल्प होऊ देणार नाही. 

- दीपक नागले, जनहक्क समिती

Web Title: Jaitapur fuel in shiv sena-BJP struggle