'कोकणसाठी जलयुक्त शिवारचे निकष बदलणार'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

चिपळूण - मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना राज्यात यशस्वी झाली आहे; मात्र तुलनेत कोकणात या योजनेतून अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे भाजप सरकार या योजनेचे निकष बदलण्याच्या विचारात असून कोकण आयुक्तांनीही निकष बदलण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. शासनस्तरावर त्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिली. 

चिपळूण दौऱ्यावर आलेल्या श्री. दरेकर यांनी मार्कंडी येथील भागवत दाभोळकर सभागृहात कार्यकर्त्यांना पक्ष बळकटीसाठी व संघटनावाढीसाठी मार्गदर्शन केले. यानंतर पत्रकारांना ते म्हणाले, ""शेतीचा शाश्‍वत विकास व्हावा, सिंचनाचे प्रमाण वाढावे यासाठी राज्यातील निवडक गावात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रात हजारो कोटींची कामे झाली. जलयुक्त शिवारमधून काम झालेल्या गावात पाणीसाठ्याची परिस्थिती सुधारली आहे. भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली. तुलनेत कोकणात ही योजना अपेक्षित परिणामकारक होताना दिसत नाही. कोकणातील जमिनीचा प्रकार, डोंगराळ भाग आदी विविध कारणामुळे राज्यातील विविध भागासाठींचे निकष कोकणास लागू पडताना दिसत नाहीत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेचे निकष बदलावेत, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगामी काळात या योजनेचे निकष बदलण्यात येतील.'' 

ते म्हणाले, ""राज्याच्या तुलनेत कोकणात भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. नेमके आम्ही कोठे चुकलो याचे विश्‍लेषण सुरू असून त्यावर उपाययोजना करीत पक्षाची वाटचाल सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांना प्रथम केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची इत्यंभूत माहिती असणे आवश्‍यक आहे. शासकीय योजना तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचल्या तरच पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे.'' यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रामदास राणे, उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, नगरसेवक विजय चितळे उपस्थित होते. 

"भीम' ऍपचे उद्दिष्ट 
या दौऱ्याच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, कॅशलेसाठीचे "भीम' ऍप आदी योजनांचा आढावा घेतला जात आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान 10 हजार लोकांनी "भीम' ऍप डाऊनलोड करावे, हे उद्दिष्ट कार्यकर्त्यांना दिले असल्याचे दरेकर यांनी सांगितले. 

Web Title: jalyukat shivar yojana the criteria will change for konkan