कोकणातील खारभूमीच्या संरक्षणार्थ बंधारे ; जांभा चिरे व्यवसाय पुन्हा सुरू होणार

सचिन माळी
Friday, 30 October 2020

आमदार योगेश कदम यांनी निदर्शनात आणून दिल्याप्रमाणे खाडी किनाऱ्यावरील गावे खारे पाणी शेतात घुसल्याने शेतकरी भूमिहीन होवू लागले आहेत.

मंडणगड - कोकणातील खाडी किनारी वसलेल्या गावांच्या नापीक बनत चाललेल्या शेतजमिनी संरक्षित करण्यासाठी खारभूमी बंधारे बांधण्याच्या दृष्टीने त्याचे मापदंड शिथिल करून शेतकऱ्यांना शेती व भूमीहीन होण्यापासून वाचवणार असल्याचे मत महसूल, ग्रामविकास, खारभूमी, बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. यावेळी जांभा चिरा व्यवसाय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय झाल्याचे संकेत दिले. कोकण दौऱ्यात आमदार योगेश कदम यांच्या मंडणगड निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार योगेश कदम यांनी निदर्शनात आणून दिल्याप्रमाणे खाडी किनाऱ्यावरील गावे खारे पाणी शेतात घुसल्याने शेतकरी भूमिहीन होवू लागले आहेत. याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खार भूमी बंधारे बांधण्याबाबत असणाऱ्या मापदंडात बदल होणे गरजेचे असून शासन दरबारी वास्तव परिस्थिती मांडून धोरणात्मक निर्णय करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वीप्रमाणे खार बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जागा नापीक होवू न देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील जांभा चिरा खाणी अल्पावधीतच सुरू करण्याचे संकेत दिले. आमदार योगेश कदम यांनी यासाठी आग्रही भूमिका मांडली असून यासंदर्भात शासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याचे सत्तार म्हणाले. निसर्ग चक्री वादळामुळे दापोली व मंडणगड या दोन तालुक्यातील घरांचे, शासकीय इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी वाळू, रेती महत्वाचा घटक आहे. मात्र सावित्री खाडीत वाळू उत्खनन बाबत कोणतेही निर्णय शासनाने घेतले नाहीत. यामुळे गोरगरीब जनतेला जास्त किमतीच्या दराने वाळू खरेदी करावी लागते.

हे पण वाचा पेच अखेर सुटला ; नाशिक मालेगाव कॅंप येथील उप-अधीक्षक मंगेश चव्हाण यांची शहर पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती  

त्यामुळे मोठी आर्थिक झळ नागरिकांना बसत असल्याचे आमदार योगेश कदम यांनी निदर्शनात आणून दिले. यासंदर्भात रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू दरापेक्षा कमी दर व सावित्री खाडीत वाळू उत्खननला परवानगी मिळावी यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना करून प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याविषयी सूचना अब्दुल सत्तार यांनी केल्या. तसेच बाणकोट खाडी मुखाशी वर्षानुवर्षे साचलेला गाळ उपसा करून जलवाहतूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करून पर्यटन विकासासाठी आग्रही राहणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामविकास माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आमदार योगेश कदम यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jamba Chire business will resume