जानवली नदीपात्र कोरडे पडल्याने लगतच्या गावात पाणी टंचाईची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

एक नजर

  • कणकवली शहरालगतचे जानवली नदीपात्र कोरडे. 
  • लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्‍यता
  • जानवली परिसरातील ऊस शेती देखील धोक्‍यात.
  • जानवलीचा नदी पुनरूज्जीवन योजनेत समावेश करण्यात आला होता; मात्र निधीअभावी योजना रखडली. 

कणकवली - शहरालगतच्या जानवली नदीपात्र कोरडे पडल्याने लगतच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्‍यता निर्माण झाली आहे. जानवली परिसरातील ऊस शेती देखील धोक्‍यात आली आहे. जानवली नदीचा नदी पुनरूज्जीवन योजनेत समावेश करण्यात आला होता; मात्र निधीअभावी ही योजना देखील रखडली आहे.

फोंडाघाट येथील डोंगरातून उगम पावणारी जानवली नदी वरवडे संगम येथे गडनदीला जाऊन मिळते. या नदीपात्रात हरकुळ खुर्द धरणातील पाणी सोडले जात असल्याने डिसेंबर पर्यंत मुबलक पाणीसाठा असतो. मार्च नंतर मात्र सर्वच जलस्त्रोत आटल्याने ही नदी कोरडी पडली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या करंजे, नागवे, साकेडी आदी गावांना बसला आहे. या गावातील सार्वजनिक नळपुरवठा योजना देखील बंद होण्याच्या स्थितीत आहेत.

मुबलक पाणी साठा असल्याने जानवलीनदी काठी ऊस शेतीचे क्षेत्र देखील विस्तारले होते. मात्र एप्रिल पासून पाणी टंचाईचा झळा तीव्र होत असल्याने जानवली वगळता उर्वरीत गावातील ऊस शेती बंद करण्यात आली आहे. तर जानवली गावातील ऊस शेती विहिरीच्या पाण्याने जगवली जात आहे.

जानवली नदीचा नदी पुनरूज्जीवन योजनेत समावेश करण्यात आला होता. जलपुरूष राजेंद्र सिंग यांनी देखील नदीच्या उगमापासून संगमापर्यंत दौरा करून नदीचा पुर्नभरण आराखडा तयार केला होता; मात्र निधी अभावी या योजनेची सर्व कामे ठप्प झाली आहेत.

कुर्ली-घोणसरी धरणाचा कालवा जोडण्याची मागणी
जानवली नदीला मुबलक पाणी राहावे यासाठी कुर्ली-घोणसरी धरणाचा डावा तीर कालवा फोंडा नदीला जोडण्याची मागणी फोंडाघाट ते जानवली गावातील ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र कालव्याच्या कामाला अद्याप सुरवात झालेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janwali river bed dry Water scarcity in Kankavali