चिपळुणात काविळीची साथ नाही

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

काविळीची लक्षणे
पोटात दुखणे, मळमळ, उलटी, अन्न न पचणे, भूक मंदावणे, डोळे पिवळसर दिसणे ही काविळीची लक्षणे आहेत. काहींच्या लिव्हरला सूजही येते. 

चिपळूण - शहरात काविळीची साथ नसली तरी अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी येथील पालिकेने जनजागृती आणि उपायोजना करण्यास सुरवात केली आहे, अशी माहिती नगराध्यक्षा  सुरेखा खेराडे यांनी पत्रकारांना दिली. नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सौ. खेराडे म्हणाल्या की, शहरात काविळची साथ नाही; मात्र काही ठिकाणी रुग्ण आढळले आहेत. संशयित रुग्णांनी तपासणी केल्यानंतर निम्यापेक्षा जास्त लोकांना काविळ नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरही अफवा पसरवली जात असल्यामुळे पालिकेने उपाययोजना सुरू केल्या. बाहेरच्या खाद्यपदार्थांसह प्रामुख्याने दूषित पाण्यामुळे काविळची साथ पसरते. विशिष्ट प्रकारच्या विषाणूंमुळे कावीळचे अ आणि ब असे दोन प्रकार पडतात. अ प्रकारची कावीळ दूषित पाण्याने होते. ब प्रकारची रक्तात शिरत असल्याने तो गंभीर प्रकारचा आजार मानला जातो. पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील हॉटेल आणि हातगाड्यांची तपासणी सुरू केली आहे. नागरिकांना पिण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पाण्यावर क्‍लोरीनची प्रक्रिया केली जात आहे. नगराध्यक्ष, पाणी सभापती, पाणी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील गोवळकोट आणि खेर्डी येथील पंपहाऊसची पाहणी केली. दोन्ही ठिकाणचे क्‍लोरिन युनिट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेने नाले, गटार व पऱ्हे यांची स्वच्छता सुरू केली आहे. या कामाचेही नगराध्यक्षांनी आढावा घेतला. आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरात सर्व्हेसाठी फिरत आहेत. नागरिकांनी कावीळपासून वाचण्यासाठी कोणती उपायोजना केली पाहिजे याची माहिती पालिकेचे कर्मचारी नागरिकांना देत आहेत. याशिवाय लाऊडस्पीकरद्वारे शहरात जनजागृती केली जात आहे. 

कावीळ ओळखण्यासाठी प्रथम पॅथॉलॉजी लॅबमध्ये रक्त व लघवीच्या नमुन्याची तपासणी करावी. संशयित रुग्णांनी हळद, तळलेले पदार्थ टाळून दूध भात, दूध पोळी, कॅडबरी आदी साधे पदार्थ खावेत. पिण्याचे पाणी उकळून गार करून प्यावे. जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. शिळे पदार्थ जेवणात टाळावे. बर्फाचे कुठलेही पदार्थ घेऊ नये, बाहेरचे खाद्य पदार्थ टाळावेत. अस्वस्थ वाटत असल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. परस्पर औषधे घेऊ नयेत. 
- डॉ. विश्‍वास बर्वे, चिपळूण

Web Title: jaundice diseases