जवान तुपारे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

कोवाड - लेह-श्रीनगर येथील दराज येथे कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले जवान महादेव पांडुरंग तुपारे यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 12) सकाळी "वीर जवान तुझे सलाम'च्या जयघोषात महिपाळगड येथे व 14 जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. 

तुपारे हे गुरुवारी (ता. 9) लेह-श्रीनगर मार्गावरील दराज बर्फवृष्टीत सापडून मृत्युमुखी पडले होते. गुरुवारपासून ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. बेळगाव येथे काल पार्थिव आल्यानंतर सेना दलातर्फे मानवंदना देऊन शासकीय वाहनातून पार्थिव महिपाळगडला आणले. शिनोळी व देवरवाडी येथील ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. पार्थिव घरी आणल्यानंतर तुपारे यांची आई, पत्नी रूपा व प्रीतम व अंश या दोन्ही मुलांना व अन्य नातेवाइकांना शोक अनावर झाला होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अमित सैनी व खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे सांत्वन केले. कोल्हापूर पोलिस दल व 109 टीए बटालियन व कुमाऊ रेजिमेंट उत्तराखंडच्या जवानांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. तुपारे यांचे भाऊ पुंडलिक यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. 

शहीद जवान तुपारे हे कोल्हापूरचे भूषण होते. त्यांच्या वारसांना सरकारतर्फे आठ लाखांची आर्थिक मदत लवकरच दिली जाणार आहे. 
- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री 

तुपारे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात सहभागी आहोत. केंद्र सरकारकडून त्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देऊ. 
- धनंजय महाडिक, खासदार

Web Title: jawan tupare cremated