दाभोळ, जयगड खाडीत जेलीफिशचा वावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

गुहागर : दाभोळ, जयगड खाडी परिसरात तसेच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून येत आहेत. पर्यटकांसाठी हे जेलीफिश आकर्षण ठरत आहेत. याच वर्षी जेलीफिशचे प्रमाण वाढल्याने मासेमारी करणारे वैतागले आहेत. या जेलीफिशना पर्यटकांनी हाताळू नये, अशा सूचना मच्छीमारांनी दिल्या आहेत. 

गुहागर : दाभोळ, जयगड खाडी परिसरात तसेच कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात जेलीफिश आढळून येत आहेत. पर्यटकांसाठी हे जेलीफिश आकर्षण ठरत आहेत. याच वर्षी जेलीफिशचे प्रमाण वाढल्याने मासेमारी करणारे वैतागले आहेत. या जेलीफिशना पर्यटकांनी हाताळू नये, अशा सूचना मच्छीमारांनी दिल्या आहेत. 

थंडीच्या मोसमात कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर तसेच खाडी किनाऱ्यांवर जेलीफिश आढळून येतात. यावर्षी त्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. जाळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात जेलीफिश सापडत आहेत. त्यामुळे मच्छीमारदेखील हैराण झाले आहेत. जाळ्यात सापडलेले जेलीफिश मच्छीमार सावधपणे उचलून समुद्रात पुन्हा फेकून देतात. जेलीफिशला आपल्या शरीराचा स्पर्श झाला, तर त्या भागाला कंड सुटते. काही वेळा लाल रंगाचे चट्टे शरीरावर उठतात. त्याच्या वेदना होतात. याला स्थानिक भाषेत 'विषारी शेपटीचा फटका बसला' म्हटले जाते. काही जेलीफिशना असलेल्या धाग्यांमुळे हा प्रकार होतो. 

कोकणात सध्या दिसत असलेले जेलीफिश हे मळकट पांढऱ्या रंगाचे, मशरूमसारखे दिसणारे आहेत. समुद्रामध्ये विविध रंगाचे आकर्षक जेलीफिश सापडतात. जेलीफिशच्या काही जाती इतक्‍या पारदर्शक असतात की, त्या डोळ्यांना दिसून येत नाहीत. 

काय आहे जेलीफिश... 
डायनासोरच्या अस्तित्वाच्या आधीपासून सुमारे 600 दशलक्ष वर्षांच्या आधीपासून समुद्रात जेलीफिशचे वास्तव्य आढळून येते. थंड, उबदार समुद्र प्रवाहांमध्ये जेलीफिशचे वास्तव्य असते. जेलीफिश हे मत्स्य वर्गात मोडत नाहीत. अपृष्ठवंशीय म्हणजे मणका नसलेला प्राण्यांच्या समूहामध्ये त्यांचा समावेश होतो. पचनसंस्था नसलेला जेलीफिश त्यांच्या सूक्ष्म नांगीसारख्या पेशीमध्ये भक्ष्य पकडून त्यामधील अन्नघटक शोषून घेतात. अत्यंत छोटे मासे, खेकडे आणि पाणवनस्पती हे त्यांचे खाद्य आहे. समुद्री कासवांसाठी जेलीफिश हा आवडता खाद्यप्रकार असतो. 

''जेलीफिश स्पर्श करणाऱ्याच्या शरीरात एकप्रकारचे टॉक्‍झिन सोडतात. ते शरीरात मोठ्या प्रमाणात गेल्यास जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी किनाऱ्यावर सावध राहिलेले बरे. टॉक्‍झिन कमी असेल तर त्वचेवर व्हिनेगर लावावे. त्याने वेदना कमी होतात. जेलीफिशचे प्रमाण अचानक का वाढले, याचा शास्त्रीय अभ्यास करावा लागेल.'' 
- डॉ. स्वप्नजा मोहिते, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव-रत्नागिरी

Web Title: Jellyfish seen in Guhagar, Dabhol